व्यायामासाठी चाललेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले, कात्रज परिसरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार दागिने हिसकाविणार्‍या टोळीने धुडगूस घातला आहे. त्यामुळे पादचारी महिला, जेष्ठ महिलांसह शालेय विद्यार्थिंनीमध्ये भीतीचे वातावरण आहे. व्यायामासाठी निघालेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना 4 डिसेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास कात्रजमधील कमलासिटी सोसायटी परिसरात घडली. ललिता सुनील देशमुख (वय – 40) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललिता कुटूंबियासह कात्रज परिसरात राहायला आहेत. 4 डिसेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास त्या व्यायाम करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी ललिता यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील 20 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.