दत्त नामाच्या जयघोषात नारायणपुरात दत्तजन्म सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष आणि हजारो भाविकांनी केलेल्या फुलांच्या वर्षावात श्रीक्षेत्र नारायणपूर येथे सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी श्रीदत्त जन्मसोहळा साजरा झाला. जन्म सोहळय़ानंतर पाळणा गायन, नाव ठेवणे, सुंठवडा वाटप, देवभेट आदी विधी यथासांग पार पडले. सद्गुरू नारायण महाराज यांच्या अधिपत्याखाली सोहळा पार पडला.

मंगळवार जयंतीचा मुख्य दिवस असल्याने सकाळी 9 ते 11 या वेळात महापूजा, अभिषेक, महाआरती, विविध गावांतून आलेल्या दिंडय़ांचे स्वागत आदी धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाल्यावर श्रीदत्त जन्मावर आधारित आख्यान झाले. त्यानंतर 7 वाजून 03 मिनिटांनी मंत्रोच्चार आणि फुलांच्या वर्षावात श्री दत्तजन्म सोहळा संपन्न झाला.

आमदार संजय जगताप, वर्ध्याचे माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर राहुल जाधव, विश्व हिंदू प्रचारक दादा वेदक, मुंबई मार्केट यार्डचे बाळासाहेब सोळस्कर, बबन टकले, एम. के. गायकवाड, तात्यासाहेब भिंताडे, डी.वाय.एस.पी. धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सरपंच चंद्रकांत बोरकर, उपसरपंच धनश्री झेंडे, जालिंदर कामठे, रामभाऊ बोरकर, नितीन झेंडे, दादा भुजबळ, भरतनाना क्षीरसागर यांच्यासह मोठय़ा संख्येने सेवेकरी हजर होते.

सोमवारी (दि. 5) यज्ञकुंड वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी चार ते आठ या कालावधीत 200 कोटी शिवदत्तनाम यज्ञाचा 22वा वर्धापनदिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बुधवार (दि. 7) जयंती सोहळ्याचा अखेरचा दिवस असून, शाही मिरवणुकीने श्रीदत्त पालखीची ग्रामप्रदक्षिणा, उत्सव मूर्तींना चंद्रभागा स्नान होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.