
>> संजय कुळकर्णी
2022 डिसेंबर महिन्यात घाशीराम कोतवाल पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करून 51 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. रंगभूमीचा ठेवा असलेल्या घाशीराम कोतवालचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग सुरू होत आहेत.
काही नाटकं अशी असतात की ती समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीवर अनेक वर्षं अधिराज्य गाजवतात. ते नाटक एक कुतूहल निर्माण करतं. नाटकाच्या फॉर्मबद्दल चर्चा होते. नाटकाच्या कथेवर म्हणा त्यातील व्यक्तिरेखेवर वाद हे उत्पन्न होतात. त्यासाठी कोर्ट कचेऱया होतात. त्यातून ते नाटक अलगदपणे सुटतं. अशा नाटकाच्या प्रयोगाची गणती होऊच शकतं नाही. जोपर्यंत रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत तोपर्यंत ते नाटकसुद्धा होत राहणार. येणाऱया अनेक पिढय़ा ते नाटक करीत राहणारच. कारण ते रंगभूमीवरचे माईलस्टोन नाटक आहे. होय, मी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाबद्दल बोलतोय. विजय तेंडुलकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले एक अजरामर नाटक. 16 डिसेंबर 1972 या दिवशी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. आता हे नाटक 16 डिसेंबर 2022 या दिवशी पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करून 51 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. आज त्या नाटकाच्या सादरीकरणात तितकीच कलाकारांची ऊर्जा आहे. तितकेच ते नाटक भिडतं आणि प्रयोग पाहिल्याचं समाधान देते.
काही नाटकाच्या प्रयोगाच्या कथा या असतात. बरोबर 50 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 1972 रोजी पुण्याच्या भरत नाटय़ मंदिरात राज्य नाटय़ स्पर्धेत या नाटकाचा पहिला प्रयोग प्रोग्रेसिव्ह ड्रमॅटिक असोसिएशन पीडीए या संस्थेनं सादर केला. सर्वांना परिचित आहे की घाशीराम कोतवाल हे नाटक पुण्याच्या थिएटर अकॅडमीने सादर केले नाही. ते पीडीएनी प्रथम केले. राज्य स्पर्धेत सादर झालेल्या नाटकाचे दिग्दर्शक जब्बार पटेलच होते. डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, श्रीराम रानडे, रवींद्र साठे आणि मोहन गोखले हे कलाकार होते. 40 कलाकारांच्या संचातील या नाचत्या-गात्या नाटकाच्या यशाचं श्रेय लेखक – दिग्दर्शकांइतकंच भास्कर चंदावरकर यांच्या संगीताला आणि कृष्णदेव मुळगुंद यांच्या नृत्य दिग्दर्शनाला जातं. कालांतराने पीडीएचे सर्वेसर्वा भालभा केळकर यांनी हे नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. कलाकारांना ते रुचलं नाही. ती मंडळी त्या संस्थेतून बाहेर पडली. त्यांनी थिएटर अकॅडमी या संस्थेची स्थापना केली. घाशीराम कोतवाल या नाटकाचे वीस वर्षे सातत्यानं प्रयोग सादर केले. त्या कलाकारांना घाशीरामने नाव मिळवून दिले. चित्रपट नाटय़सृष्टीत ते स्थिरावले. त्यानंतर मूळच्या संचाने अनेक कारणामुळे प्रयोग थांबवल्यानंतर अनिल जोगळेकरांनी नव्या संचात घाशीराम कोतवाल सादर करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना विजय कुलकर्णी यांची साथ लाभली. प्रयोग करता करता निर्माते बदलत होते. 2012 पासून मात्र मेघराज भोसले हे त्यांच्या ‘पांडव’ या संस्थेतर्फे घाशीरामच्या प्रयोग सादर करीत आले आहेत. गेली 28 वर्षं माधव अभ्यंकर, राहुल जोशी आणि प्रदीप फाटक हे कलाकार या नाटकात कायम आहेत. त्यांनी निर्मिती मूल्यांमध्ये कोणतीही तडजोड न करता, सादरीकरणामध्ये कोणतीही कमतरता येऊ न देता जुन्याचं दिमाखात आजही प्रयोग हा सादर केला जातो. घाशीराम कोतवाल नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवर संगीतापासून ते सादरीकरणापर्यंत सगळ्याचं चौकटी तोडणारं तरीही अस्सल भारतीय मराठी नाटय़ परंपरेशी जोडणारं नाटक. लोक परंपरेतील संगीत आणि नृत्याची गुंफण करत करत समूहाच्या मदतीने लोकनाटय़ाची लवचिकता वापरून घडविलेले घाशीराम कोतवाल म्हणजे मराठी रंगभूमीवरील बावन्नकशी नाणंच. त्यामुळेच सगळ्या वादांना पुरून उरून थेट परदेशातील नाटय़ महोत्सवाचे निमंत्रण या नाटकाने मिळविले आणि युरोप अमेरिकेत मराठी रंगभूमीचा झेंडा फडकावला. 1980 युरोप दौरा , 1986 अमेरिका – कॅनडा 1989 रशिया, पूर्व जर्मनी आणि फ्रान्स असे अर्ध्याहून जास्तच जगाचं दर्शन कलाकारांना मिळालं. त्यामुळे त्यांचं कलाजीवन हे समृद्ध झाले असेल. या नाटकाचे हिंदी, गुजराती, बंगाली, इंग्रजी, मणिपुरी राजस्थानी अशा तब्बल 11 भाषांमध्ये अनुवाद झाले. या नाटकाची तारीफ पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इब्राहिम अल्काझी, दिलीप कुमार, पीटर बुक अशा जाणकारांनी केली आहे. भालचंद्र कुबल यांनी काही महिन्यापूर्वी हिंदीतून घाशीराम कोतवालचे प्रयोग करून यश संपादन केले. प्रदीप कबरे त्या हिंदी नाटकात घाशीराम साकार करताहेत. त्या नाटकाचे नेपथ्यसुद्धा वेगळं आहे.
आनंद मोडक यांनी घाशीराम कोतवाल नाटकाबद्दल काही वर्षांपूर्वी संवाद साधला होता. आज ते आपल्यात नाहीत. पण घाशीराम कोतवाल नाटकाबद्दल त्यांच्या काही गोष्टी आठवल्या.ते म्हणतात, ‘आम्ही तालमीला कळत नकळत गेलो. जब्बार पटेल दौडवरून तालमीसाठी सायंकाळी येतं असतं. ते येण्याआधी मुळगुंद सर सुरुवातीला तालाच्या मात्रांवर बद्ध अशा काही स्टेप्स आम्हाला शिकवतं. गंमत म्हणजे त्यातील एकही स्टेप नाटकात वापरली नाही. पण आमची शरीरे नृत्य करण्याकरिता लवचिक आणि अनुकूल व्हावीत हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. गाण्यांच्या बाबतीत तेच म्हणता येईल. भास्कर चंदावरकर आम्हाला संहितेतल्या पद्यात्मक नादमय संवादावर चढविलेल्या स्वरावली शिकवतं. जब्बार पटेल तालमीला आले की सर्वाना नवे संजीवन आणि नवा हुरूप येई. नाटककार विजय तेंडुलकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, संगीतकार भास्कर चंदावरकर, नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद या प्रतिभावंतांच्या पारस्पारिक आदानप्रदानातून घाशीराम कोतवालसारखी युगप्रवर्तक कलाकृती आकाराला आली. माझ्या आयुष्याला ‘घाशीराम कोतवाल’नी नवा अर्थ दिला, नवी दिशा दिली. त्यामुळे या नाटकाला माझ्या आयुष्यातलं स्थान महत्त्व अनन्यसाधारण आहे.’
2022 डिसेंबर महिन्यात घाशीराम कोतवाल पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करून 51 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. रंगभूमीचा ठेवा असलेल्या घाशीराम कोतवालचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग सुरू होतं आहेत. गेली 28 वर्षं या प्रयोगाचे व्यवस्थापन सुरेंद्र दातार यांच्या ’कलाभारती’ करताना दिसली. मुंबईत प्रयोग यशस्वी करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आज या घडीला त्यांची दृष्टी गेली असूनसुद्धा सुवर्ण महोत्सवासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. आर्थिक मदतीची हाक त्यांनी दिली आहे. शुक्रवार 16 डिसेंबर रोजी दीनानाथ नाटय़मंदिरात दुपारी 3.30 आणि शनिवार 17 डिसेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह दुपारी 4 वाजता सादर होणारं आहेत. रसिक प्रेक्षक त्या प्रयोगाना हाऊस फ़ुल्ल प्रतिसाद देणार यात शंकाच नाही.































































