
डॉ. संजय वर्मा
अलीकडेच सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये आयोजित परिषदेत उद्योजकांनी म्हटले की, क्रिप्टो बाजारात दीर्घकाळापर्यंत मंदीची शक्यता आहे. त्यांच्या मते, अमेरिकी बाजारात क्रिप्टोचा व्यवसाय करणारी आणि त्यासाठी कर्ज देणारी नामांकित कंपनी ‘एफटीएक्स’ ही अचानक कोसळल्याने क्रिप्टो बाजारात खळबळ उडाली आहे. क्रिप्टो चलनातील गुंतवणुकीचे मूल्य वेगाने घसरत आहे. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी अर्ज दिला आहे. त्याच वेळी ही कंपनी गैरव्यवहारात असल्याचे सांगतले जात आहे. गैरव्यवहार व्यापक असेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.
गुंतवणूकदारांसाठी आकर्षण राहिलेले बिटक्वाईन किंवा क्रिप्टो बाजार मंदावल्याने सध्या सर्वदूर चिंतेचे वातावरण आहे. क्रिप्टो करन्सीचे एकूण भांडवल 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात तीन ट्रिलियन डॉलर होते. जुलै 2022 मध्ये त्यात घसरण होऊन एक ट्रिलियन डॉलरपेक्षा कमी राहिले. अलीकडच्या घटनांमुळे क्रिप्टोचे एकूण मूल्य आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रमुख क्रिप्टो कंपन्यांची दिवाळखोरी, रोखीची चणचण, फसवणूक, संस्थांची तपासणी आदी कारणांमुळे चलनावरच्या अधुऱया विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. याला तज्ञांनी ‘क्रिप्टो विंटर’ असे नाव दिले आहे. कारण येत्या काळात क्रिप्टोसाठी आणखी मोठय़ा अडचणी येऊ शकतात, अशी शक्यता आहे.
गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांपासून एका योजनेने लक्ष वेधून घेतले आणि ते म्हणजे बिटक्वॉईन किंवा क्रिप्टो करन्सी. गेल्या दशकभरात लोकांनी या व्हर्च्युअल किंवा आभासी चलनात मोठय़ा प्रमाणात पैसा गुंतवला आणि मोठी कमाई केली, मात्र 2022 हे वर्ष क्रिप्टोसाठी खूपच वाईट राहिले. देशात कायदे अधिक कडक केल्याने क्रिप्टोचा बाजार हा संकुचित झाला. अर्थात आपल्या देशात क्रिप्टोची चर्चा ही वाईट नाही. कारण हिंदुस्थानातील दीड ते दोन कोटी नागरिकांनी क्रिप्टोमध्ये पैसा गुंतवला आहे. देशात 350 क्रिप्टो स्टार्टअप आणि एक्स्चेंजदेखील होते. क्रिप्टोला आज न उद्या चांगले दिवस येतील, असा विश्वास या लोकांत निर्माण केला जात आहे, मात्र सत्य परिस्थिती पाहिल्यास देशातील 65 ते 75 टक्के नागरिकांनी पैसा गमावला आहे. अशा वेळी हे आभासी चलन हा फुगवटा का सिद्ध होत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. गुंतवणुकीचे चांगले माध्यम असतानाही यावर संशय कायम का आहे, अशी चर्चा आहे.
जगभरातील क्रिप्टो बाजाराची स्थिती पाहण्यापूर्वी हिंदुस्थानातील क्रिप्टोला असलेल्या कायदेशीर दर्जाबाबत विचार करायला हवा. हिंदुस्थान क्रिप्टो करन्सी आणि व्हर्च्युअल डिजिटल असेट्स बेकायदा नाही, मात्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या बाजारावर बंदी आणण्याची शंका व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात आपल्या देशात मार्च 2022 पर्यंत कोणताही व्हीडीए म्हणजे क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोणीही व्यापार करू शकत होता, मात्र त्यावर धोरणात्मक बंधने आणल्याने हिंदुस्थानातील क्रिप्टो करन्सीच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. डिजिटल चलन विधेयक 2021 मध्ये सर्व खासगी क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. अर्थात यात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यांसारख्या अपवादाचा समावेश आहे. यानुसार केंद्रीय बँक डिजिटल चलनासाठी एक आराखडा तयार करत असून त्याचे संचलन आरबीआयकडून केले जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणातून एक आशेचा किरण दिसला होता. त्यात त्यांनी व्हर्च्युअल डिजिटल असेट्ची (व्हीडीए) संकल्पना स्पष्ट केली आणि व्हीडीएच्या (क्रिप्टो करन्सीसह) भांडवली लाभावर 30 टक्के सरसकट प्राप्तीकर लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. या निर्णयाबाबत मत मांडताना अनेक विश्लेषकांनी संसदेचा बदलता दृष्टिकोन अशा शब्दांत भाष्य केले. केंद्र सरकारचे हे एक सकारात्मक पाऊल आहे, असेही म्हटले गेले, मात्र हिवाळी अधिवेशनात क्रिप्टो करन्सीला नियमन करणारे विधेयक आणले जाऊ शकते आणि त्यानुसार सर्वप्रकारच्या क्रिप्टो करन्सीवर निर्बंध आणण्याचा निर्णय होऊ शकतो. त्याचवेळी क्रिप्टो करन्सी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून काही सवलती दिल्या जाऊ शकतात. विधेयकाच्या आधारे भारतीय रिझर्व्ह बँक अधिकृत चलन जारी करण्यासाठी सुविधाजनक आराखडा तयार करू शकेल, हा त्यामागचा उद्देश आहे, पण क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करणाऱयांना काही लाभ मिळणार आहेत का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
हिंदुस्थानी गुंतवणूकदारांची दिशा आणि दशा पाहता दोन प्रकारचे तथ्य पाहावयास मिळतात. पहिले म्हणजे जागतिक पातळीवरच्या क्रिप्टो बाजाराची स्थिती कशी आहे आणि त्यात हिंदुस्थानी गुंतवणूकदारांनी किती पैसा टाकला आहे, हे पाहिले पाहिजे. क्रिप्टोचे आकलन करणारी संस्था ‘क्वाईन मार्केट कॅप’च्या मते, आभासी चलनाचे ग्लोबल मार्केट कॅप दोन ट्रिलियन (दोन लाख कोटी) डॉलरच्या आसपास होते आणि त्या वेळी जगात दहा हजारांपेक्षा अधिक क्रिप्टो करन्सी चलनात होत्या. शिवाय ‘चेन-एनालिसीस’च्या अहवालानुसार ‘क्रिप्टो ऍडाप्शन इंडेक्स’ (2021) रॅकिंगमध्ये हिंदुस्थान जगात दुसऱया स्थानावर आहे. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या ब्लॉकचेन आणि क्रिप्टो ऍसेट कौन्सिलने जारी केलेल्या आकलनानुसार हिंदुस्थानात सुमारे दीड ते दोन कोटी क्रिप्टो करन्सीचा वापर करणारे गुंतवणूकदार असून त्यांच्याकडे सुमारे 0.9 अब्ज डॉलर क्रिप्टो मालमत्ता आहे. ही संपत्ती हिंदुस्थानातील क्रिप्टोचा संभाव्य बाजाराचे प्रतीक राहू शकते, मात्र या शक्यतेसमोर उभे ठाकलेले जागतिक संकट या मार्गातील मोठा अडसर ठरू शकतो.
अलीकडच्या घटनांमुळे क्रिप्टोचे एकूण मूल्य आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रमुख क्रिप्टो कंपन्या अपयशी ठरल्याने, रोखीची चणचण, फसवणूक, संस्थांची तपासणी आदी कारणांमुळे चलनावरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. कदाचित या कारणांमुळे तज्ञांनी ‘क्रिप्टो विंटर’ असे नाव दिले आहे. कारण डिसेंबर महिन्यात क्रिप्टोसाठी आणखी मोठय़ा अडचणी येऊ शकतात, अशी शक्यता आहे.
अर्थात क्रिप्टोने नेहमीच खिसा रिकामा केला आहे, असे नाही. अलीकडच्या काळात एका रात्रीतून क्रिप्टोने अनेकांना श्रीमंत केले, मात्र त्याच्या व्यवहारात कायदेशीर तरतुदी आणि पारदर्शकतेचा अभाव राहिला आहे. जगात अल साल्वाडोरसारख्या देशाचे उदाहरण दुर्मीळ आहे. या देशात आभासी चलनाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. दुसरीकडे रिअल इस्टेटमधील मंदीमुळेदेखील गुंतवणूकदारांचा क्रिप्टोकडे ओढा वाढला आहे. क्रिप्टोचा इतिहास पाहिला तर गुंतवणूकदारांना हजारो पटीत परतावा दिला आहे. या घसघशीत परताव्यामुळे लोकांचे पाय क्रिप्टोकडे वळले. ‘डिजिटल चलन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रिप्टो डॉटकॉम’च्या मते, सध्या जगभरात 22.1 कोटी नागरिक आभासी चलनात व्यवहार करत आहेत. चीन येथील एका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2020 ते जून 2021 या काळात हिंदुस्थानात क्रिप्टोचा बाजार 641 पट वाढला होता. तसेच मध्य आणि दक्षिण आशियायी देशातदेखील याच कालावधीत हा बाजार 572.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला, मात्र क्रिप्टोची विश्वासार्हता ही कमीच राहिली आहे. आता डिजिटल रुपयाचे लॉचिंग केल्यानंतर हिंदुस्थानी गुंतवणूकदारांना सुरक्षित आभासी चलनात पैसा गुंतवणूक करणे आणि त्यातून फायदा मिळवणे यासारखी संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
(लेखक बेनेट युनिव्हर्सिटी येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत)





























































