फक्कड फ्रेंच फ्राईज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

काही पदार्थ त्यांच्या नावातूनच आपला ठावठिकाणा सांगत असतात. कोल्हापुरी मिसळ, नाशिकचा चिवडा, सुरती खमण अशी मोठी यादी तयार होऊ शकते. पाश्चिमात्य पदार्थांमध्ये असा प्रांताचा ठावठिकाणा सांगणारा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज. त्याचीच ही मसालेदार गोष्ट.

फ्रेंच फ्राईज हे काही मुख्य खाणं नव्हे… बर्गर, फ्राईड चिकन, ग्रील्ड स्टीक, सिझलर्स अशा दमदार पदार्थांसोबतची तळलेल्या बटाटय़ाची साईड डिश अशी या फ्राईजची ओळख, पण काही वेळा लग्नात नवरीपेक्षा करवलीच अधिक मिरवते, तसं काहीसं फ्रेंच फ्राईजचं झालेलं दिसतं.

लगतच्या सीमा असणाऱया देशांत एखाद्या पदार्थावरून वाद असणं नवं नाही. या फ्राईज मूळचा आमचाच असा दावा फ्रान्स आणि बेल्जियम दोन्हींकडे होताना दिसतो.

नावात फ्रेंच असल्याने आपण फ्रान्सला झुकतं माप देतो, पण बेल्जियमवासीयांची कहाणीही चटकदार आहे.

संशोधकांच्या मते, 1600 च्या दशकात बेल्जियम मंडळींनी बटाटे तळून खायला सुरुवात केली होती. बेल्जियम लोककथेनुसार नदीतले मासे पकडून तळून खाणं म्युज व्हॅलीतील लोकांचा आवडता आहार होता. कडाक्याच्या थंडीत नदी गोठली की, त्यांचे खाण्यपिण्याचे हाल होत. अशा वेळी शाकाहाराशिवाय पर्याय नसे. तेव्हा ही बेल्जियम मंडळी माशांप्रमाणेच बटाटे तळून खात. तेच फ्रेंच फ्राईजचं मूळ मानता येईल.

असं हे बेल्जियम मंडळींचं खाणं फ्रेंचांच्या नावे का बरं प्रसिद्ध झालं? तर सामान्यपणे प्रांतांच्या सीमाभागात पदार्थांची देवाणघेवाण होत असते. फ्रेंच मंडळींनीही हा पदार्थ स्वीकारला. काही जुन्या फ्रेंच पुस्तकांमध्ये या फ्राईजचा उल्लेखही आढळतो. काही फ्रेंच मंडळींच्या मते, फ्रेंच राज्यक्रांती काळात एक फेरीवाला फ्रेंच फ्राईज विकत असे… त्यानेच हा शोध लावला. फ्रेंचमध्ये या फ्राईजना फ्रिट्स म्हटले जाई. ‘पोमेस द तेरे फ्रिटस्’ असा मूळ उल्लेख आढळतो.

दोन्ही देश फ्रेंच फ्राईज आमचेच असा दावा करत असताना, बेल्जियम पदार्थांपेक्षा फ्रेंच खानसाम्यांची जगभरातील प्रसिद्धी पाहता कदाचित मूळ बेल्जियममध्ये, पण नाव फ्रेंचांचे अशी शक्यता नाकारता येत नाही.

पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैनिकांना या फ्राईज गवसल्या. त्याआधीही खलाशांमार्फत त्या जगभरात ज्ञात होत्या, पण पोटभरीचा पदार्थ म्हणून महायुद्धानंतरच्या काळात फ्रेंच फ्राईजना विशेष मागणी आली. मॅकडोनाल्डसारख्या चेन्सनी या बेल्जियम/फ्रेंच फ्राईजना जगभरात पोहचवलं.

फ्रेंच फ्राईजचं वर्णन ‘सीनफुल जॉय’, ‘पापी रुचकर आनंद’ असं करता येईल. तळलेला त्यातही मीठ भुरभुरवलेला बटाटा म्हणजे आरोग्यपूर्ण खाण्यावरचा धब्बाच. समोर फ्रेंच फ्राईजच्या सोनेरी लडय़ा पसरलेल्या असताना, त्या खाणं पाप आहे हे माहीत असतं.

‘मना वासना दुष्ट कामा न ये रे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे।।’ 

असं मनाला बजावणं सुरू असतं. अशा वेळी संयमाची परीक्षा पाहणाऱया फ्राईज अनेकदा जिंकतात. अजून दात न फुटलेल्या मंडळींपासून ते वयोमानानुसार सगळे दात गायब झालेल्या मंडळींपर्यंत फ्रेंच फ्राईज सुपरहिट आहेत.

गरमागरम सोनेरी फ्राईजचा तुकडा मोडताना त्यातलं मुबलक तेल, मिठाचा हलकासा खारटपणा अपराधीपणाची टोचणी देता देताच एक न रोखता येणाऱया आनंदाची लहर देऊन जातो. साईड डिश म्हणून सोबत येऊनही मूळ पदार्थाला विसरवण्याचं फ्रेंच फ्राईजचं सामर्थ्य त्यांना खास बनवून जातं.