
मुंबईच्या वरळी येथील ‘नेहरू सेंटर’ कलादालनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, बाळ राणे, वसंत हळबे, वसंत गव्हाणकर, प्रभाकर ठोकळ, हरिश्चंद्र लचके, वसंत सरवटे, वसंत सबनीस, श्याम जोशी, शंकरराव किर्लोस्कर आणि दीनानाथ दलाल या दिग्गज व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या समकालीन विषयांवरील व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन 16 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 असे पंधरा दिवस सुरू आहे.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि बरंच काही सहजपणे समजून घ्यायचं असेल तर ‘व्यंगचित्र’ पाहणंच नाही तर वाचणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं. ‘व्यंगचित्र’ नुसतं हसवतच नाही, तर ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते. हा रेखांकन प्रकार इतका प्रभावी आहे की, पाहणाऱ्याला तो क्षणभर थांबवतोच. अशा या ‘व्यंगचित्रां’च्या कलेला दैनंदिन संवादात आणण्याचे काम जे करतात, तेच पुढे ‘व्यंगचित्रकार’ म्हणून ओळखले जातात.
धारदार शब्दांपेक्षाही प्रभावी ठरलेल्या व्यंगचित्र कला प्रकारात समोरच्याची वैगुण्ये वा दोष अत्यंत चपखलपणे मांडून, सत्यकथन करण्याची ताकद असते. त्यामुळे अगदीच राग येणं, हाणामारी होणं अशा घटना एका व्यंगचित्रामुळे टाळता येतात. उलट समोरच्याला त्याचे दोष मिश्कीलपणे सांगून कार्यभाग उरकण्याचं काम ‘व्यंगचित्र’ करतं.
कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील, जास्तीत जास्त आशय आणि शक्यतोवर शब्दांशिवाय ‘व्यंगचित्र’ साकारता वा रेखाटता येणं… फारच कौशल्य असेल तरच शक्य आहे, असं म्हटलं जातं. या प्रदर्शनाच्या प्रत्यक्षात उतरविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करणाऱ्या ‘नेहरू सेंटर’ कलादालनाच्या व्यवस्थापिका नीना रेगे म्हणाल्या, “आजच्या पिढीने कार्टुन्स जोखलं पाहिजे, यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन आहे.’’ स्वतः नीना रेगे याही एक सिद्धहस्त आणि कलेचं अधिकृत कलाशिक्षण घेतलेल्या असल्यामुळेच ‘नेहरू सेंटर’ कलादालनाने ‘मास्टर्स’ या सदराखाली हे एकंदर 28 वे ‘मास्टर्स’ प्रदर्शन आयोजिलेले आहे. पैकी यापूर्वी त्यांनी व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आणि मारिओ मिरीज यांची स्वतंत्रपणे दोन ‘व्यंगचित्रं’ प्रदर्शने आयोजित केली होती.
‘आठवणी हास्यरेषांच्या’ हे 28 वे ‘मास्टर्स प्रदर्शन’ दृश्यकला इतिहासाचे ‘आयकॉन’ ठरावे असेच आहे. ‘व्यंगचित्र’ कलेला उपलब्ध छपाई आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये संवादाचे ‘मार्मिक’ तसेच ‘मिश्कील’ माध्यम असेच म्हणावे लागते. मग ते ‘व्यंगचित्र’ म्हणजे एखादे ‘बॉक्स कार्टुन’ असो की, ‘स्टोरी स्लेट’ किंवा ‘व्यंगचित्र शृंखला’ असो. ती एखाद्या व्यक्तीवर असू शकतात, विचार प्रवाहावर असू शकतात. अगदी थोडक्यात कथन करायचं असल्यास, ‘कुठल्याही प्रासंगिक तसेच मानवी आस्था असणाऱ्या विषय वा घटनेवरील अत्यंत सोप्या, मोजक्या वैशिष्टय़पूर्ण शैलीत व्यक्त होणाऱ्या, मात्र मिश्किली ठरणाऱ्या, मनोरंजन पण करणाऱ्या रेषांच्या आकारांना आकृतींना ‘हास्यचित्र’ म्हटलं जायचं. हेच ‘हास्यचित्र’ पुढे ‘व्यंगचित्र’ मग ‘अर्कचित्र’ अशा नावांनी वैशिष्टय़पूर्ण ठरत गेलं. सभ्यतापूर्ण उपहास, कठोर टीका, प्रशंसा, अपमान, कटुसत्यता, अतिशयोक्तीपूर्ण, अवास्तवी अशा वैविध्यांनी नटलेली ही व्यंगचित्रे म्हणूनच ‘स्मृतीप्रवण’ असतात. या प्रदर्शनातील व्यंगचित्रे पाहताना भूतकाळातील समाजकारण, राजकारण आणि समकालीन सामाजिक परिस्थिती पाहिल्याचा आनंद मिळतो. खरं तर अत्यंत बोलक्या रेषांनी ‘इतिहास’ सांगणारा इतका प्रभावी दृश्यकला प्रकार पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतो. या अमूल्य कलाकृती विनामूल्य मोबदल्यात उपलब्ध करून देणाऱ्या ‘नेहरू सेंटर’ कलादालनाचं कलाकार्य म्हणूनच मौल्यवान ठरतं!
>> प्रा. डॉ. गजानन शेपाळ ([email protected])





























































