संरक्षक भिंत तोडली; सुरक्षारक्षक नाही अन् वीजपुरवठाही गायब, नगर महापालिकेच्या सरोज जलकुंभाची सुरक्षा धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झेंडीगेट येथील सरोजबागेतील जलकुंभाकडे गेल्या वर्षभरापासून महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जलकुंभाच्या अस्तित्वाबरोबरच नगरकरांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उड्डाणपुलाच्या ठेकेदाराने या जलकुंभाची संरक्षण भिंत पाडून टाकली असून, तेथे कोणताही सुरक्षारक्षक अथवा महापालिकेचा कर्मचारी नसतो. त्यामुळे या जलकुंभाची सुरक्षा वाऱयावर असल्याचे दिसून येत आहे.

नगर शहरातील ऐतिहासिक सरोजबागेत महापालिकेची पाणी साठवण टाकी असून, या टाकीतून सारसनगर, मार्केट यार्ड, स्टेशन रोड, माळीवाडा, जीपीओ, दाळमंडई, आडतेबाजारबरोबरच शहरातील निम्म्याहून अधिक भागाला पाणीपुरवठा केला जातो. बागेच्या चारही बाजूने पूर्वी संरक्षक भिंत होती. मात्र, वर्षभरापूर्वी बागेलगत असलेल्या महामार्गाकडील बाजूने असलेली बागेची संरक्षक भिंत उड्डाणपुलाच्या ठेकेदाराने तोडली.

बागेच्या एका बाजूकडील संरक्षक भिंत तोडण्यात आल्यामुळे बागेबरोबरच टाकीचे संरक्षण धोक्यात आले आहे. महामार्गावरून होणाऱया हजारो वाहनांची ये-जा व टाकी व बागेत महापालिकेच्या कर्मचारी व सुरक्षारक्षकांची अनुपस्थिती यामुळे कोणीही बागेत व टाकीवर जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती; परंतु परिसरातील जागरूक नागरिकांनी टाकीवरून चित्रीकरण करणाऱया विदेशी पर्यटकांना हाकलले होते. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने या टाकीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रात्रंदिवस मनपाचा एकही कर्मचारी येथे नसतो. त्याचबरोबर बागेत विद्युत व्यवस्था नसल्यामुळे जुगारी व दारूडय़ांची सोयच झाली आहे.

अशा स्थितीत एखाद्या माथेफिरूकडून नगरकरांच्या जीविताला धोका निर्माण होणारे कृत्य केले जाऊ शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून, तातडीने संरक्षण भिंत बांधण्यासह इतर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.