
चिनी लष्कराने काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हिंदुस्थानी लष्कराने धैर्य दाखवत चीनने अचानक केलेल्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी जवानांनी चिनी सैनिकांची पाठलाग करत धुलाई केली व त्यांचे मनसुबेही पूर्ण होऊ दिले नाहीत. मात्र आता तवांगमध्ये मार खाल्ल्यानंतर चिनी ड्रॅगनची वागणूक बदलली आहे. रविवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, चीन हिंदुस्थानसोबतचे संबंध चांगले, स्थिर आणि मजबूत करण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर हिंदुस्थान-चीन सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रविवारी सांगितले की, चीन चांगले संबंध राखून हिंदुस्थानसोबत काम करण्यास तयार आहे. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना वांग म्हणाले की, “चीन आणि हिंदुस्थान यांनी राजकीय आणि लष्करी माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवला आहे. दोन्ही देश सीमावर्ती भागात स्थिरता राखण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही एकत्र काम करण्यास तयार आहोत. 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये हिंदुस्थान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर चीनचे हे वक्तव्य समोर आले आहे.


























































