प्रचंड होणार नेपाळचे पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून नियुक्तीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे (सीपीएन) प्रमुख नेते आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड हे पुन्हा नेपाळचे पंतप्रधान होणार आहेत. त्याबाबतची घोषणा नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी आज केली आहे. त्यानुसार उद्या सोमवारी सायंकाळी चार वाजता प्रचंड यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली जाणार आहे. चीन समर्थक म्हणून प्रचंड यांना ओळखले जाते.

नेपाळमध्ये सरकार बनवण्याबाबत राजकीय पक्षांनी ठोस भमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी केले होते. त्यानुसार आज प्रचंड यांच्या सीपीएन पक्षाने माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षासह अन्य पाच पक्षांसोबत हातमिळवणी करत राष्ट्रपतींची भेट घेत सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्यांच्याकडे बहुमत असल्याचे निदर्शनास येताच राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी प्रचंड यांची पंतप्रधान पदी नियुक्ती घोषित कोली आहे. नेपाळमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रचंड आणि केपी शर्मा ओली यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार पहिली अडीच वर्षे प्रचंड तर पुढील आडीच वर्षे ओली नेपाळचे पंतप्रधान असणार आहेत. त्याआधारेच त्यांनी इतर पाच पक्षांसोबत हातमिळवणी करत सरकार बनवण्याचा दावा केला होता.

तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार

पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याआधी 2008मध्ये ते प्रथम पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

नेपाळच्या संसदेत एकूण 275 सदस्य आहेत.

बहुमतासाठी 138 सदस्यांची गरज असून प्रचंड-ओली यांच्याकडे 169 सदस्य आहेत.

विरोधात असलेल्या शेर बहादूर देऊबा यांच्या नेपाळ काँग्रेसकडे 89 सदस्य आहेत.