
नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱया रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यरने जागतिक कसोटी क्रमवारीत झेप घेतली आहे. अश्विनने हिंदुस्थानच्याच जसप्रीत बुमराहची बरोबरी साधली असून दोघेही 812 गुणांसह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे श्रेयस अय्यरने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीची नोंद करीत 26 वरून थेट 16 व्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र फलंदाजांच्या या क्रमवारीत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची घसरण झाली आहे. हिंदुस्थानच्या रवींद्र जाडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले असून या यादीतही अश्विन दुसऱया क्रमांकावर आहे. फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम आहे. फलंदाजांमध्ये मार्नस लाबुशन तर गोलंदाजीत पॅट कमिन्स अव्वल स्थानी विराजमान आहे.

























































