
मालाड येथील प्रसिद्ध ‘एम. एम.’ मिठाई दुकानाच्या बेकायदा बांधकामावर पालिकेने आज कारवाई केली. या कारवाईत परिसरातील दिल्ली स्वीट, जलपान दुकान मोबाईल दुकानातील अनधिकृत बांधकामांवरही पालिकेने कारवाई केली. आगामी काळात बेकायदा बांधकामांवर कारवाई वेगात करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मालाड पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील एम. एम. मिठाई दुकानाच्या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते कामात अडथळा येत आहे. याबाबत पालिकेच्या पी उत्तर विभागाकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दुकानातील अनधिकृत बांधकामांची पाहणी केली होती. यानंतर आज दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण मलिक आणि उपअभियंता आनंद नेरुरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पी उत्तर विभागाचे सहा कामगार, एक जेसीबी व 20 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



























































