
>> शब्दांकनः राज चिंचणकर
आयुष्यात वेळोवेळी पाठीशी उभ्या राहिलेल्या सुहृदांच्या आठवणींत रमले आहेत… लेखक, दिग्दर्शक व अभिनेते राजेश देशपांडे.
राजापूर तालुक्यातील ‘येळवण’ नावाच्या एका दुर्गम खेडय़ातून मी क्रिकेटर बनण्यासाठी आणि कला क्षेत्रात काहीतरी करायची स्वप्ने घेऊन मुंबईत आलो. त्या वेळी मी अकरावीत शिकत होतो. माझ्या नातेवाईकांनी मला मुंबईत थारा दिला होता. त्या वेळी मुंबईच्या संघाकडून रणजी खेळलेले क्रिकेटर सुभाष बांदिवडेकर कोचिंग करायचे. मी त्यांच्या शिबिरात गेलो. त्यासाठी कसेबसे पैसे जमवून स्पाइकचे बूट आणि पांढरे कपडे घेतले. बाकी क्रिकेटचे किट वगैरे घेणे मला शक्यच नव्हते. मी ऑफस्पिन चांगली टाकत असे. मे महिन्यातले ते शिबीर संपले आणि पाऊस संपल्यावर पुन्हा शिबीर होणार होते. मग तोपर्यंत हाती वेळ असल्याने नाटकाच्या ग्रुपमध्ये जाऊन शिकायचे ठरवले. त्यामुळे क्रिकेटचे बूट मामाच्या फ्लॅटमध्ये ठेवून दिले. दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा क्रिकेटच्या शिबिरात जायचे म्हणून बूट काढले, तर ते उंदरांनी कुरतडून टाकले होते. ते पाहून मी अक्षरशः ओक्साबोक्शी रडलो. त्याचबरोबर माझे क्रिकेटर होण्याचे स्वप्न तिथेच कुरतडले गेले.
हा प्रकार घडल्यावर मग मी जीव तोडून नाटक शिकायला लागलो. त्या वेळी वामन केंद्रे ‘झुलवा’ हे नाटक दिग्दर्शित करत होते. त्या काळी गाजलेल्या या नाटकाच्या समूहात मला काम करण्याची संधी मिळाली. यातून मराठी प्रायोगिक रंगभूमीची नशा चढली. त्यानंतर विविध एकांकिका स्पर्धा आणि राज्य नाटय़ स्पर्धेत मी छोटय़ा छोटय़ा भूमिका केल्या. बॅकस्टेज करत, शिकत असतानाच, अचानक दोन दिवसांवर आलेल्या कोल्हापुरातल्या एका एकांकिका स्पर्धेत 70 वर्षांच्या वृद्ध वकिलाची प्रमुख भूमिका करण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी मी 21 वर्षांचा होतो. नाटकातल्या सगळय़ा भूमिका मी एकप्रकारचा व्यायाम म्हणून तयार करून ठेवत असे. त्याचा फायदा मला कायम होत गेला.
प्रमुख भूमिका करण्याचे स्वप्न घेऊन मी मुंबईत माझ्या ज्या नातेवाईकांकडे राहत होतो, त्यांच्याकडून मला निघावे लागले. कारण त्यांचीही काही अपरिहार्य अडचण होती. मुंबईत निवासाची तर दुसरी सोय नव्हती. त्यामुळे आयुष्यातली ही ‘शेवटची भूमिका’ करायची आणि कोल्हापूरवरून पुन्हा राजापूर गाठायचे, असे मी ठरवले. आमचा प्रयोग झाला. त्या रात्री दिग्दर्शक भारत तांडेल यांनी माझ्या हातात एक फॉर्म दिला आणि ते म्हणाले, ‘यावर सही कर.’ ते ‘दूरदर्शन’साठी एक दीर्घांक करणार होते आणि ते त्यात मला घेणार होते. मी म्हणालो, ‘सर, मी नाही करू शकत आता नाटक. मी इथून गावाला जातोय आणि पुन्हा इथे नाही येऊ शकणार.’ मी त्यांना माझी समस्या सांगितली. त्यांनी विचारले, ‘तुझे ते नातेवाईक दोन-तीन दिवस तरी ठेवतील ना तुला घरात?’ मी म्हणालो, ‘हो, ठेवतील.’ त्यावर ते दिग्दर्शक म्हणाले, ‘मग तू गावाला जाऊन लवकर परत ये. आपण काहीतरी व्यवस्था करू तुझी राहायची.’
मी गावाला जाऊन पुन्हा मुंबईत आलो. त्यांनी मला त्यांच्या बँकेत बोलावून घेतले. त्यांच्या बँकेत असलेला फुटबॉल खेळाडू मोहन पिल्ले याला त्यांनी बोलावून घेतले. त्यांनी त्याला सांगितले, ‘हा राजेश, आजपासून तुझ्या घरी राहील.’ मोहन पिल्ले बँकेच्या क्वार्टर्समध्ये एकटा राहत असे. त्याने माझ्याकडून एकही पैसा भाडे न घेता, लहान भावासारखे त्याच्या रूमवर ठेवले, पण जेवण मात्र मला बाहेर करायला लागायचे. कारण मोहन सकाळी दोन कच्ची अंडी खाऊन फुटबॉल प्रॅक्टिससाठी जायचा, तो थेट रात्री घरी यायचा. मग मी पण त्याच्यासोबत सकाळी दोन कच्ची अंडी खायला लागलो. त्यामुळे झाले असे की, दिवसभर मला भूक लागत नसे आणि अगदीच भूक लागली, तर मी केळी खात असे. माझ्या आयुष्यात आलेल्या अशा अनेक सुहृदांमुळेच आज मला हे सर्व सांगण्याची संधी मिळत आहे.
पुढे माझ्या कारकीर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर वीरेंद्र प्रधान भेटला. त्याच्यामुळे मला ‘चंद्रलेखा’ यासारख्या नामवंत संस्थेत काम करायची संधी मिळाली. सुशील देशपांडे याच्यामुळे मला मालिका क्षेत्राची कवाडे उघडी झाली. विद्याधर पाठारे यांच्यामुळे ‘गंगूबाई’ घराघरांत पोहोचली. गोविंद चव्हाण यांच्यामुळे ‘हिमालयाची सावली’ यासारख्या महत्त्वाच्या नाटकाचे आव्हान मला यशस्वीरीत्या पेलता आले. गिरीश साळवी याच्यामुळे ‘धुडगूस’सारखा चित्रपट करायची मला संधी मिळाली. हाऊसफुल्ल चाललेला हा चित्रपट मुंबईतल्या 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यामुळे थांबला. खूप दुःख झाले, पण आपल्याकडून भविष्यात अजून खूप काही होणार आहे म्हणूनच नियती असा खेळ करतेय असे मला वाटले. हे मनात पक्के करत पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझ्या आयुष्यात पदोपदी असे अनेक सुहृद आले आहेत आणि त्यांच्या ऋणात मला कायम राहायला आवडेल.



























































