
शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऋषभ पंतच्या गाडीला दिल्ली-डेहराडून महामार्गावर अपघात झाला. या भीषण अपघातातून ऋषभ पंत थोडक्यात बचावल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. ऋषभच्या कारच्या अपघाताचे फोटो पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. ऋषभची कार भरधाव वेगात असताना ताबा सुटल्याने ती अचानक डिव्हायडरला धडकली. यानंतर कारने पेट घेतला यात गाडी संपूर्ण जळून खाक झाली आणि अखेरीस गाडीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. अपघातानंतर त्याला जखमी अवस्थेत डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
ऋषभ पंतच्या अपघातानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, शिखर धवनचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो ऋषभ पंतला गाडी हळू चालवण्याचा सल्ला देत आहे. हा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा आहे. शिखर धवन आणि ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळायचे. दिल्ली कॅपिटल्सच्या एका शो दरम्यान दोन्ही खेळाडू आपापसात चर्चा करत होते.
या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत शिखर धवनला विचारतो की “तुम्हाला मला जर एखादा सल्ला द्यायचा असेल, तर काय द्याल?” यावर शिखर धवन क्षणाचाही विलंब न करता म्हणतो की “गाडी हळू चालवत जा”, त्यावर ऋषभही बोलतो की “ठीक आहे, मी तुमचा सल्ला मानतो. मी गाडी हळू चालवत जाईन”
Shikhar Dhawan warned Rishabh Pant years ago.pic.twitter.com/BTzuWGb68t
— Memories of Sachin (Playing it my way) (@GemsofSachin) December 30, 2022
दोघांच्या या संभाषणावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ऋषभने धवनचा तो सल्ला लक्षात ठेवला असता तर आज त्याचा अपघात घडला नसता. असे चाहते म्हणत आहेत.




























































