
शंभर रुपये न दिल्याने मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याने एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पाषाण भागात शनिवारी ध्यरात्री घडली. हल्ल्यात तरुणाचा पंजा तुटला असून याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी वेळीच मदत केल्यामुळे तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात पंकज अनंत तांबोळी (वय 25, रा. पाषाण ) याचा डावा हात मनगटापासून तुटला आहे. या प्रकरणी प्रणव काशीनाथ वाघमारे (वय 18, रा. शिक्षक कॉलनी, सूस रस्ता, पाषाण) आणि गौरव गौतम मानवतकर (वय 20, रा. तोंडेचाळ, सुतारवाडी, पाषाण) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या बरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशुतोष अर्जुन माने (24, रा. दुर्वांकुर सोसायटी, पंचवटी, पाषाण) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी आणि त्याचे मित्र पाषाण परिसरात राहायला आहेत. पंकज एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असून खाणावळ बंद असल्याने पंकज आणि त्याचे मित्र मध्यरात्री पाषाण परिसरातील साई चौकात जेवण करायला गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपीनी त्याच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली. पंकजने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्याचा हाताचा पंजा कापला गेला.
घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर यांच्यासह तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने पंकजला तातडीने रुग्णालयात दाखल केले. चतु:शृंगी पोलिसांकडून पसार अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे.



























































