
तरुण रक्तात नेहमीच एक चैतन्य सळसळत असतं. काहीतरी करून दाखविण्याची धमक या वयात नसानसांमध्ये भिनलेली असते. आयुष्यातला असा काळ ज्यात प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छा असते. चुकीचं घडताना त्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद असते. हाच अंदाज आपल्याला अभिनेता ललित प्रभाकरच्या रूपाने आगामी ‘टर्री’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगडय़ा अंदाजात ‘टर्री’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचं बेधडक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आले. येत्या 17 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय गौरी नलावडे, शशांक शेंडे, अनिल नगरकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.
























































