श्री विठ्ठल मंदिराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी 73 कोटी रूपयांचा आराखडा बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची बैठक नवीन भक्त निवास येथे पार पडली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शिवाजी महाराज मोरे, भास्करगिरी महाराज, ऍड. माधवी निगडे, डॉ. दिनेश कदम, संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. तर सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व सदर आराखडा बनविणाऱया आठळे असोसिएटच्या तेजस्विनी आठळे हे दोघे ऑनलाईन हजर होते.

बैठकी ठोंबरे म्हणाले, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व समितीच्या अंतर्गत येणाऱया 28 परिवार देवतांची मंदिरे यांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने 73 कोटी रूपये मंजूर केले आहेत. यामध्ये मुख्यतः मंदिराचे अनेक वर्षे जतन व्हावे, संवर्धन करणे, मूळ स्वरूपात रचना करणे आदींचा समावेश आहे. त्यानुसार मंदिर समितीने एक आराखडा सादर केला होता. या आराखडय़ाचे मागील महिन्यात मुख्य सचिवांच्या समिती समोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यांनी काही सूचना केल्या. तसेच, आज मंदिर समितीच्या बैठकीतही सदस्यांनी काही सूचना मांडल्या. या दोन्ही सूचनांचा एकत्रित आराखडा तयार करून याला मान्यता घेण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार आषाढी वारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले.

आराखडय़ानुसार मंदिरात करण्यात येणार बदल

राज्य शासनाच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर मूळ स्वरूपात भाविकांना दिसणे आवश्यक आहे. मंदिराचे जतन करताना पुढील शेकडो वर्षे याला धक्का लागणार नाही, त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी काळा व तांबडा दगड वापरून आकर्षक पध्दतीने काम केले जाणार आहे. पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना मूळ मंदिर पहावयास मिळत नाही. यासाठी सभामंडपातील डावीकडील कार्यालये काढून येथूनच दर्शन रांग सुरू करण्यात येणार आहे. देवाच्या गाभाऱयातील मार्बल काढून टाकले जाणार आहे. मंदिरातील जुन्या वीजेच्या वायरी काढणे, पावसाळ्यात पाणी गळण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. फरशी काढून या ठिकाणी दगडाची फरशी व आवश्यक तेथे दगड व लाकडाचे काम केले जाणार आहे. भाविकांसाठी आवश्यक ठिकाणी छत उभारले जाणार आहे.