
बॉलिवूडमधील चित्रपटात छोटीशी भूमिका साकारण्यापासून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आता लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपटात पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये त्याने वेगवेगळ्या धाटणीचे विषय हातळत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र छोट्या भूमिकांपासून सुरुवात करणारा नवाझुद्दीन आता मात्र कुणी 25 कोटी जरी दिले तरी छोटी भूमिका करणार नसल्याचे सांगतो. नुकतीच नवाझुद्दीनने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली असून त्यात त्याने हे म्हटले आहे.
”आता तर कुणी मला 25 कोटी जरी दिले तरी मी छोटी भूमिका साकारणार नाही. छोट्या भूमिका खूप साकारल्या आता बस झालं. माझा विश्वास आहे की तुम्ही स्वत:ला एवढं सक्षम करा, स्वत:त एवढ्या सुधारणा करा की पैसा आणि प्रसिद्धीच तुमचे गुलाम बनतील व तुमच्या मागे धावतील’ असे नवाझुद्दीन सिद्दीकीने या मुलाखतीत सांगितले.
लवकरच नवाझुद्दीन अमेरिकन चित्रपट लक्ष्मण लोपेझ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नवाझने हॉलिवूडमध्येही पदार्पणासाठी एक अट ठेवली होती. हॉलिवूडमध्येही मुख्य किंवा तेवढ्याच ताकदीची मोठी भूमिका मिळत नाही तोपर्यंत पदार्पण करणार नाही असे त्याने ठरवले होते. अखेर दिग्दर्शक रोबेर्टो गिराल्ट यांच्या चित्रपटात त्याला मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली आहे.


























































