
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला सांगलीचे विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली आहे. लखन सुधाकर देवकुळे (वय 30, रा. तासगाव) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 27 जुलै 2017 रोजी घडली होती.
पीडित मुलगी कुटुंबीयांसह तासगाव परिसरात राहत होती. आरोपी देवकुळे याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून चार ते पाच वेळा अत्याचार केले. 27 जुलै 2017 रोजी पीडित मुलगी गेटचे कुलूप लावण्यासाठी आली असता, दुचाकीवरून आलेल्या देवकुळे याने तिला पळवून नेले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात ’पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. प्रशांत कुंभार यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व तिची आई, शासकीय पंच यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. त्यानुसार विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. माधव कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. त्यांना हेड कॉन्स्टेबल माळकर, हवालदार वंदना मिसाळ, कॉन्स्टेबल सुप्रिया भोसले, सहायक फौजदार शरद राडे यांचे सहकार्य लाभले.





























































