विचित्र अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू, जे. व्ही. एल. आर. जंक्शन येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाल्याची घटना मंगळवारी जे.व्ही.एल.आर. जंक्शनला घडली. या अपघातात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱया अनिश लाड या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सुरेश वेल्लोरी हे जखमी झाले. याप्रकरणी वाहनचालक राजेंद्र कौडरला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली.

अनिश हा अंधेरी येथे राहत असून तो कांदिवली येथील एका कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्गात शिकत होता. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला मोटरसायकलने कांदिवलीच्या दिशेने जात होता. तेव्हा महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीचा चालक राजेंद्रचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने त्याचे वाहन हे सुरेश याच्या वाहनाला धडकले. सुरेश हे एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. वाहनाने धडक दिल्याने सुरेश याच्या गाडीची एअर बॅग उघडली. त्यामुळे त्यांना दुखापत झाली.

हा प्रकार तेथे गस्तीला असलेल्या ट्राफिक वार्डनच्या लक्षात आला. त्याने सुरेश यांना रुग्णालयात नेले. त्यानंतर राजेंद्रच्या वाहनाने अनिशच्या मोटरसायकलला धडक दिली. त्या धडकेत अनिश जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिशकडे असलेल्या कॉलेजच्या ओळखपत्रावरून त्याची जोगेश्वरी पोलिसांनी ओळख पटवली. अपघातप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी राजेंद्रविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.