मांढरदेव, सुरूर येथील यात्रा कालावधीत कलम 144 लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई तालुक्यातील मांढरदेव येथे श्री काळूबाई देवी व सुरूर येथील दावजीबुवा यात्रा दि. 5 ते 7 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी 4 जानेवारीपासून ते 4 फेबुवारीपर्यंत या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 मधील अधिकारान्वये प्रतिबंधात्मक तथा बंदी आदेश तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी रणजित भोसले यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार मांढरदेव परिसरात यात्रा कालावधीमध्ये मांढरदेव परिसरात कोंबडय़ा, बकऱया, बोकड इ. प्राण्यांचा बळी देण्यास, हत्या करण्यास तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी करण्यात आली आहे.

मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱया झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळया बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आली आहे. तसेच परिसरात मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.