
शहरात फलटण नगरपालिकेतर्फे ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम सुरू होती. या ‘अतिक्रमण हटाव’ला विरोध करून व्यापाऱयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यावर विचार करून ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे
फलटण नगरपालिकेतर्फे शहरात ‘अतिक्रमण हटाव’ची मोहीम सुरू करण्यात आली होती. अतिक्रमणे काढण्यापूर्वी नोटिसा दिलेल्या नव्हत्या तसेच तोंडे बघून अतिक्रमणे काढल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. ‘अतिक्रमण हटाव’चा सर्वाधिक फटका नागरिक आणि सामान्य व्यापाऱयांना बसला आहे. धनदांडग्यांची अतिक्रमणे तशीच राहिल्यामुळे ‘फलटण बंद’ पुकारण्यात आला होता. तसेच, व्यापाऱयांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते.
जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी सर्व कायदेशीर बाबी व प्रक्रिया यांचा अवलंब करून तसेच सहायक संचालक नगररचना यांनी अतिक्रमणाबाबत सर्व्हे करून अतिक्रमणे अधोरेखित केल्याशिवाय अतिक्रमणे काढण्याची कारवाई करू नये. तसेच चालू असलेली अतिक्रमण मोहीम थांबविण्याच्या सूचना फलटण प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

























































