रेल्वेतील अलार्म चेनचा गैरवापर करणाऱ्या 8,176 प्रवाशांवर कारवाई; 55.86 लाखांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून अलार्म चेन पुलिंगचा (ACP) गैरवापर होण्याच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवत आहे. जानेवरी ते डिसेंबर 2022 या वर्षात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 9,049 अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे 8,176 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 55.86 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अनेकदा प्रवासी उशिरा पोहोचल्यामुळे, मधल्याच स्थानकांवर उतरण्या/चढणे इत्यादी अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा (ACP) गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे.

ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगचा (ACP) गैरवापर केल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

विभागनिहाय करण्यात आलेली कारवाई
मुंबई विभाग – 3302 व्यक्ती – रु.23.79 लाख
भुसावळ विभाग – 2476 व्यक्ती – 19.12 लाख
नागपूर विभाग – 1024 व्यक्ती – रु.8.65 लाख
पुणे विभाग – 1173 व्यक्ती – रु.2.94 लाख
सोलापूर विभाग – 202 व्यक्ती – रु. 1.36 लाख

मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन आहे कि, अनावश्यक/फालतू कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा (ACP) गैरवापर करू नका. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग (ACP) करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान 30 मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.