पंढरपूर – विठ्ठल मंदिराचा 3 टप्प्यात होणार विकास, पथकाने केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संवर्धनाचा आराखडा तयार झाला आहे. 73 कोटी रुपयांचा हा आराखडा कशा पद्धतीने राबवायचा याची मंदिर समिती सदस्य व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहणी केली. यावेळी मंदिराचा तीन किंवा चार टप्प्यांमध्ये विकास करण्याचा निर्णय झाला.

श्री विठ्ठल रुक्मिणी व मंदिर संवर्धनासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी मागणी करुन पाठपुरावा केला होता. डॉ गोऱ्हे यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी 73 कोटी रुपये निधी बजेट मध्येच तरतूद केली.

सदर निधीमधून मंदिराचे सुशोभीकरण करण्याचा आराखडा मंदिर समितीने तयार केला आहे. तो राज्य शासनाने मंजूर केल्यावर तातडीने या कामास सुरुवात केली जाणार आहे. यासाठी आज मंदिर समितीची बैठक पार पडली. यामध्ये समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व सदर आराखडा तयार करणाऱ्या तेजस्विनी आफळे यांनी संत नामदेव पायरी पासून ते पश्चिम द्वार पर्यंत संपूर्ण मंदिराची पाहणी केली.

आराखड्यामध्ये सुचविण्यात आलेल्या कामाची प्रत्येक जागेवर जाऊन पाहणी करून चर्चा करण्यात आली. यावेळी मूळ 700 वर्षांपूर्वीचे मंदिर कोणत्या पद्धतीने संवर्धन व जतन केले जाईल तसेच ते आकर्षक दिसावे यावरही चर्चा करण्यात आली. संपूर्ण मंदिराचा तीन ते चार टप्प्यामध्ये विकास केला जाणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले. मंदिरांमधील प्रत्येक परिवार देवता तसेच प्रत्येक भागाची पाहणी यावेळी केली गेली.

आषाढी यात्रेपूर्वी मंदिर संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. दरम्यान राज्य शासनाने भाविकांच्या मागणीवरून मंदिरास मोठा निधी दिल्याबद्दल औसेकर महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तेजस्विनी आफळे उपस्थित होते.