
मन व परिसर प्रफुल्लित ठेवणारे वृक्ष म्हणजे चंदनाचे वृक्ष. शहरात वृक्षगणनेत 10 हजारहून अधिक चंदनाचे वृक्ष आढळले आहेत. जवळपास साडेपाच लाख वृक्षांची आतापर्यंत गणना झाली असून, चंदनाच्या वृक्षांची संख्या आणखी वाढणार आहेत. या वृक्षगणनेत 273 प्रकारची झाडे आढळली असून, सोलापूरकरांसाठी ही दिलासादायक घटना समजली जात आहे.
सोलापूर महापालिकेच्या वतीने गेल्या पाच महिन्यांपासून शहर व परिसरातील वृक्षांची गणना सुरू आहे. आतापर्यंत 70 टक्के गणना पूर्ण झाली असून, यात 273 प्रकारची झाडे आढळली आहेत. मुंबई येथील ‘सार’ या आयटी कंपनीला वृक्षगणनेचे काम देण्यात आले असून, आतापर्यंत जी.आय.एस. व जी.पी.एस. प्रणाली वापरून साडेपाच लाखांहून अधिक वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक वृक्ष 68 हजार निंबळ, 10 हजारहून अधिक चंदन वृक्ष, नारळ 22 हजार, आंबा 18 हजार, अशोकाच्या 13 वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. चंदनाच्या वृक्षांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, यापुढील तीन महिन्यांत वृक्षगणनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण वृक्षगणनेनंतर संकलित माहिती महापालिकेद्वारे इंटरनेटवर अपलोड करण्यात येईल. या वृक्षगणनेमुळे शहरात आढळलेल्या विविध वृक्षांचे संवर्धन व संगोपनाच्या नियोजनासाठी महापालिका ठोस उपाययोजना हाती घेणार आहे.
























































