
भाजपचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख यांच्याविरोधात फसवणुकीसंबंधी तक्रार दाखल असून, या पार्श्वभूमीवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भोला यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. यापूर्वीही बनावट कागदपत्रप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.
रविराज सूर्यकांत कदम याने आपला जेसीबी करारानुसार जून 2018मध्ये रोहन देशमुख यांना दिला होता. हा जेसीबी बेकायदा कामासाठी वापरल्यावरून शासनाने जप्त केला होता. जेसीबी कायदेशीर कामासाठी दिलेला असताना रोहन देशमुख यांनी बेकायदेशीर कामासाठी वापरल्याचा जाब रविराज कदम याने विचारल्यावरून दोघांत खटका उडाला होता.
दरम्यान, हा जेसीबी रोहन देशमुख यांनी सोडवून घेतला होता; परंतु तो नादुरुस्त झाला होता. त्यामुळे रविराज कदम याने रोहन देशमुख यांच्याविरोधात विश्वासघात व फसवणूक झाल्याच्या कारणावरून न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भोला यांनी ‘प्रोसेस इश्यू’चा आदेश दिला आहे. यात ऍड. नवगिरे, देवकर, मंद्रुपकर यांनी काम पाहिले.

























































