
>> मानसी पिंगळे (म. ल. डहाणूकर कॉलेज)
कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी शॉर्टकट नाहीत. निसर्गात फेरफटका मारल्याने आयुष्याचा खऱया अर्थाने आस्वाद घेता येतो. मग निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा, फिरण्याचा, निसर्गातील प्रत्येक सुंदर क्षण टिपण्याचा आनंद कुठे मिळणार? तर या सगळय़ांवर फारच सुंदर उपाय आहे तो म्हणजे ट्रेकिंग. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी ट्रेकिंग करावी. झाडे, डोंगर, आकाश आणि निसर्गातले प्रत्येक सुंदर घटक तुमच्या ट्रेकिंगचे साक्षीदार बनतात. तसाच एक दराया बुग्याल ट्रेक हा उत्तराखंडमधील सर्वात सुंदर व चित्तथरारक ट्रेकपैकी एक मानला जातो, कारण उंचावरील कुरणांमुळे…
लोणी महोत्सव
आजूबाजूच्या गावातील लोक दरवर्षी दराया बुग्याल येथे बटर फेस्टिव्हल आयोजित करतात. या जमिनीमुळेच त्यांची गुरे मुबलक प्रमाणात दूध देतात, असा त्यांचा विश्वास आहे. लोणी महोत्सवाचे आयोजन करून ते आपल्या गुरांच्या रक्षणासाठी देवाचे आभार मानतात. या सणाला अंदुरी सण असेही म्हणतात.
दराया बुग्याल हा एक सोपा ट्रेक आहे, नवोदित ट्रेकर्ससाठी तो योग्य आहे. दराया बुग्याल हा उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिह्यात 3 हजार 80 मीटर (12 हजार फूट) उंचीवर आहे. तसेच हा फॅमिली ट्रेकसाठीदेखील खूप प्रसिद्ध आहे. दराया बुग्याल ट्रेकचे एकूण अंतर 9 कि.मी. आहे, ते पूर्ण करायला पाच दिवस लागतात. जर तुम्हाला दराया बुग्यालमध्ये जास्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही हा ट्रेक 6 दिवसांसाठीदेखील बुक करू शकता. हे 28 किमी परिसरात पसरलेले बुग्याल (गवताळ प्रदेश) आहे. दराया बुग्यालमधून द्रौपदीचा दांडा, बंदरपूंच, काली छोटी आणि भागीरथी या हिमालयाच्या शिखरांचे वैभव पाहता येते.
हिवाळय़ात हा ट्रेक बर्फाच्या जाड चादरीने झाकलेला असतो. दराया बुग्याल ट्रेकसाठी रायथल गाव हे बेस कॅम्प आहे, जे डेहराडूनपासून सुमारे 185 किमी अंतरावर आहे, जे पूर्ण करण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. त्या प्रवासातील सौंदर्य अविस्मरणीय आहे. जसजसे रथलला पोहोचतो, जौनली पर्वत आणि द्रौपदी का दांडा शिखरांवर रंगीबेरंगी सूर्यास्ताचे साक्षीदार होण्याची संधी मिळते. त्यानंतर डेहराडूनपासून प्रवास सुरू करून, मसुरी, सुवाखोली, उत्तरकाशी आणि भटवाडीमार्गे रायथल गावात पोहोचतो. हा मार्ग पर्वतांच्या घनदाट जंगलातून जातो.
रात्रीच्या मुक्कामासाठी रथळ गावात अनेक होम स्टे मिळतील रथल होम स्टे हे सुमारे 500 वर्षे जुने होम स्टे आहे. तिथे गढवाली संस्कृती जवळून पाहण्याची संधी मिळेल. पहिल्या दिवसाचा ट्रेक रथळ ते गुईचा असेल. रथळ ते गुई हे अंतर सुमारे 3 कि.मी. आहे, हा रस्ता अखंड चढणीचा आहे. थोडं उंच गेल्यावर गावाची शेते दिसू लागतात. थोडं पुढे गेल्यावर एक छोटंसं मैदान समोर येतं. इथून पुढे रस्ता घनदाट जंगलातून जातो, ज्यात हिरव्या आणि तपकिरी ओक आणि रोडोडेंड्रॉनची झाडे आहेत. गुईला पोहोचताच तुम्हाला गावकऱयांनी बांधलेल्या झोपडय़ा दिसतील. रथलपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 3 तास लागतात म्हणून सकाळी 9 वाजता म्हणजे सकाळचा ट्रेक सुरू करा. रथलला जाणारा शेवटचा तास उतरण्यापूर्वी येथे विश्रांती घेता येते. शेवटच्या दिवशी नाश्ता करून डेहराडूनला परत.
डेहराडूनहून रथलला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. डेहराडूनहून पहिला मार्ग मसुरी, सुवाखोली, उत्तरकाशी आणि भटवाडीमार्गे रथालला पोहोचतो आणि डेहराडूनहून दुसरा मार्ग मसुरी, धनौल्टी, चंबा, उत्तरकाशी आणि भटवाडीमार्गे रथलला पोहोचतो.
पहिला मार्ग दुसऱया मार्गापेक्षा लहान असल्याने पर्यटक रथळला जाण्यासाठी पहिला मार्ग निवडतात. दिल्ली ते दराया बुग्याल ट्रेकचे अंतर 471 कि.मी. आहे, ते पार करायला सुमारे 11 तास लागतात. दराया बुग्यालमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात हिमवर्षाव होतो, जो एप्रिलपर्यंत पाहायला मिळतो.





























































