
>> रश्मी वारंग
हिवाळा सुरू होऊन बराच काळ लोटलाय, पण ज्या कडाक्याच्या थंडीची वाट पाहत होतो ती आता अवतरलीय. ग्रामीण भागातील थंडीचं नातं आहे हुरडय़ाशी, पोपटीशी आणि अलीकडेच घरातल्या चुलीवरून
हॉटेलातील पार्टीचा भाग झालेल्या वांग्याच्या भरिताशी.
शेतातल्या शेतात तयार होणाऱया पदार्थांची प्रांतानुसार स्वतंत्र कहाणी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील नगर, संभाजीनगर, सोलापूर भागात शेतातल्या शेतात भाजून खाल्ला जाणारा हुरडा असो नाहीतर रायगड जिह्यातील पोपटी असो…शेतकऱयांचं शेतातलं खाणं आता लोकप्रिय झालं असून लोक खास हुरडा नाहीतर पोपटी खायला ग्रामीण भाग गाठतात. त्याच मालिकेत आता भरीत पार्टीची भर पडलीय.
शेतातली वांगी खुडून तिथल्या तिथे भाजून खाणं हा अस्सल शेतकरी आहार. नंतर त्याच्या चवीची गोडी लागल्यावर त्यात मसाले वगैरे भरून नटवणं सजवणं ओघानं आलंच. खान्देशी वांग्याचे भरीत यासाठी प्रचंड लोकप्रिय आहे.
गंमत म्हणजे या वांग्याचा इतिहास थेट महाभारत काळाइतका जुना आहे. अशी कथा सांगतात की, महाभारतात पांडवांनी द्रौपदीला पणाला लावलं तेव्हा श्रीकृष्णाने वस्त्र्ां पुरवून तिची अब्रू वाचवली. कृष्णाचं हे ऋण फेडावं म्हणून द्रौपदीने कृष्णाला खांडवनाचा काही भाग दान म्हणून दिला. या दानासोबत तिनं जेवणाचं ताटही श्रीकृष्णाला दिलं. दिलेलं दान इतरांना दिलं की, ते वाढतं म्हणून कृष्णानं ते दान आपल्या गवळींना दिलं. असं म्हणतात की, कृष्णानं दान दिलेला देश म्हणजेच कान्हदेश. या कान्हदेशाचा अपभ्रंश होऊन झाला खान्देश. द्रौपदीने दिलेल्या त्या भोजनथाळीत अनेक पदार्थ होते त्यातला एक वातनाशक पदार्थ म्हणजे वांगं.
दुसरी आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी की, स्वामिनारायण यांनी स्थलांतर करताना आपल्या प्रत्येक शिष्याला भूक भागवण्यासाठी एक फळभाजी दिली. कडाक्याच्या थंडीत अंगात ऊब राहावी यासाठी ही भाजी महत्त्वाची असल्याने शिष्य ती घेऊन गेले. दगडांच्या चुलीवर ही फळभाजी भाजून आपलं पोट भरलं आणि थंडीपासून बचावही केला. हे होतं आपलं लाडपं भरीत वांगं!
असं हे वांग्याचं भरीत आणि भाकरी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात लोकप्रिय आहे. हिंदीत बैंगन का भरता, गुजरातीत रिंगननो ओरो, आसामीत पुरा बेगेना सतोनी, बंगालीत बेगून भोरता असं नावात वैविध्य असलं तरी साधारण कृती प्रांतनिहाय घटक इकडे तिकडे होऊन तीच.
थंडीचा कडाका असावा, ताटात गरमागरम भाकरी आणि वांग्याचं भरीत, जोडीला कांदा आणि ठेचा दिसावा. तोंड पोळलंच तर निववायला घट्ट दह्याची कवड असावी. पहिल्या घासासरशी नाकाडोळ्यांतून पाणी येत असताना त्या झणझणीत चवीचा असा दणका बसावा की, निस्ता जाळ आणि संगट धूर…
जळगावच्या वांग्याचं भरीत लोकप्रिय आहे. हिरवी पांढरी अशी ही वांगी खुडून चुलीवर गरम करतात. लाकडी ठेचण्याने ती एकसंध करतात. त्यात मग लसूण, मिरचीचा ठेचा, कांद्याची पात टाकतात. थोडे शेंगदाणे घालून हळद जिऱयाची पह्डणी देतात आणि जोडीला गरमागरम भाकरी.
कळणाची भाकरी
वांग्याचं भरीत आणि भाकरी ही महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील लोकप्रिय जोडी आहे, पण नेहमीच्या भाकऱयांपेक्षा ‘कळणाची भाकरी’ वांग्याच्या भरताला अधिक शोभून दिसते.
‘दादला नको गं बाई’ या भारुडात एकनाथांनीही या भाकरीचा उल्लेख केला आहे… ‘कळण्याची भाकर, अंबाडय़ाची भाजीवर तेलाची धारच नाही’
या वर्णनातली कळणाची भाकर म्हणजे ज्वारी, उडीद आणि खडेमीठ एकत्र दळून केलेली भाकरी. ती वांग्याच्या भरताला बहार आणते.























































