
नैनं छिन्दन्ति शस्त्रीाणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
असे एका बाजूला ‘गीता’ सांगत असताना ‘आत्मा’ असतो का? असे विज्ञान विचारत असते, इंटरनेटवर अनेकदा काही रोचक जुन्या बातम्या, प्रयोग हे पुन्हा नव्याने चर्चेत येत असतात. डंकन डॉगल नावाच्या एका डॉक्टरने 1909 साली आपल्या चार साथीदारांसह केलेला एक प्रयोग असाच पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा अनोखा प्रयोग होता आत्म्याचे वजन मोजण्याचा. शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्याचे वजन असते. अर्थात सर्व अवयवांना काही ना काही वजन हे निश्चित असते. जर शरीरात आत्मा असेल तर त्यालादेखील निश्चित काहीतरी वजन असणार असा या डॉक्टरचा अजब तर्क होता. तो पडताळून पाहण्यासाठी या महाशयांनी मृत्युशय्येवर असलेल्या 6 रुग्णांचे वजन मोजले. मृत्यूनंतर पुन्हा त्यांचे वजन मोजले असता, ते 21 ग्रॅम कमी भरले. अर्थात सर्वांचेच वजन बरोबर 21 ग्रॅम कमी भरले असा मात्र त्याचा अर्थ नाही. या प्रयोगानंतर प्राप्त झालेल्या माहितीचा अभ्यास करून डंकन डॉगलने असा निष्कर्ष काढला की, आत्म्याचे वजन 21 ग्रॅम असते. डंकन डॉगलच्या या प्रयोगाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र तो स्वतः या निष्कर्षाबद्दल ठाम नव्हता. या प्रयोगात समाविष्ट असलेल्या त्याच्या इतर दोन साथीदार डॉक्टरांच्या अभ्यासाला, त्यांच्या मताला त्याने निष्कर्ष काढताना वगळले होते असेदेखील नंतर समोर आले. त्याच्या या प्रयोगानंतर वैज्ञानिकांमध्येदेखील दोन गट पडले. पुढे डंकन डॉगलने हा प्रयोग 15 कुत्र्यांवरदेखील करून पाहिला. मात्र सर्व परिणाम निराशाजनक निघाले. मृत्यूनंतर एकाही कुत्र्याच्या वजनात फरक पडला नाही. माणसाच्या वजनात मृत्यूनंतर बदल होतो. कारण त्याच्यात आत्मा असतो आणि कुत्र्याच्या वजनात बदल होत नाही. कारण त्याच्यात आत्मा नसतो असा महान निष्कर्षदेखील त्याने नंतर काढल्याचे बोलले जाते.






















































