फडणवीस यांच्याविरोधात सतीश उके तुरुंगातून करणार युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करीत अॅड. सतीश उके यांनी नागपूरच्या दिवाणी सहन्यायाधीश व न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अॅड. सतीश उके यांना मुंबईच्या आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अॅड. सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याचदरम्यान अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील खटल्यात आर्थर रोड तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून युक्तिवाद करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यांची विनंती न्यायालयाने मान्य केल्यामुळे सतीश उके हे तुरुंगातून फडणवीस यांच्याविरोधात युक्तिवाद करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर 1996 आणि 1998 मध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवून ठेवली. दोन्ही प्रकरणांत त्यांना जामीन मंजूर झाला होता; परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना त्यांनी या प्रकरणांची माहिती उघड केली नाही, असा आरोप करीत अॅड. उके यांनी फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत कारवाईसाठी न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी विनंती अॅड. उके यांनी आपल्या याचिकेतून केली आहे.