
JDU सोबत यापुढे कधीही युती न करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपच्या या भूमिकेवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. “मी एकवेळ मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही”, असे ठाम मत नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे. यावेळी नितीश कुमार म्हणाले की, मी भाजपकडे गेलो नाही, पण त्यांचे नेते वारंवार माझ्याकडे आले आणि आम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. मात्र आता आम्ही महाआघाडीसोबत असल्याने भ्रम पसरवण्यासाठी असे बोलले जात आहे. 2024 च्या निवडणुकीत जनतेला सर्व काही कळेल, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त नितीश कुमार एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी माध्यमांनी नितीश कुमार यांना काही प्रश्न विचारले.
पुढे ते म्हणाले की, लालू प्रसाद यादव यांना फसवण्यात आले आहे. यावेळी तेजस्वी यादव देखील उपस्थित होते. तेजस्वी यांच्या वडिलांना फसवल्याचे ते म्हणाले. त्यांनी तेजस्वीच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आणि कोणतेही कारण नसताना आम्हाला पुढे ढकलले. खूप प्रयत्न करून त्यांच्याशी संबंध संपवून आता आम्ही एकत्र आलो. त्यामुळे ते काही ना काही बोलून ते संबंध बिघडवण्याचे काम करत आहेत.

























































