अलंकापुरीत एकादशीला 50 हजार भाविकांनी घेतले दर्शन; गाभाऱ्यातील पुष्प सजावटीने वेधले लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथे जया एकादशीला माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनासाठी गर्दी केली होती. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतून मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनासाठी गर्दी केली होती. एकादशीला मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे मुर्ती लक्ष वेधून घेत होती.

आळंदी मंदिरात भाविकांनी परंपरेने एकादशीला गर्दी करत श्रींचे दर्शन घेतले. एकादशीला श्रींच्या मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, श्रींचे मानकरी,पुजारी आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे मार्गदर्शनात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांनी सेवक , कर्मचारी यांचे सहकार्याने केली. मंदिरात दुपारचा फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री आरती झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली होती.

आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी परिश्रम पूर्वक काम पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून एकादशीला मुक्तता झाली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.