विशाळगडावरील बेकायदा बांधकाम पाडा; अन्यथा कारसेवा करू – संवर्धन समितीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाशिवरात्रीपर्यंत विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामे प्रशासनाने न पाडल्यास, येथे कारसेवा करण्याचा इशारा विशाळगड संवर्धन समितीकडून देण्यात आला आहे. मिरजकर तिकटी येथील कार्यालयासह सोशल मीडियामार्फत पाठविलेल्या लिंकद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहनही समितीकडून करण्यात आले.

विशाळगडावर केलेले बेकादेशीर बांधकाम त्वरित काढून टाकावे आणि गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे, यासाठी गेली अनेक वर्षे सर्व शिवभक्त लढा देत आहेत. या विशाळगडावर शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाऱया 33 ऐतिहासिक वस्तू आजही पाहण्यासाठी मिळतात.

येथे असलेल्या दर्ग्यामध्ये येणाऱया परप्रांतीय भक्तांमुळे अक्षरशः कोंडाळ्याची अवस्था प्राप्त झाली आहे. या ऐतिहासिक गडाला त्यांच्याकडून अपवित्र केले जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. गडावर मूळ लोक सोडून बाहेरून आलेल्यांनी अनेक अतिक्रमणे करून बांधकामे केलेली आहेत. या ठिकाणी कोणताही परवाना न घेता लोकांना राहण्यासाठी जागा दिली जाते. सरकारी जमिनीत अतिक्रमण करून तीन मजली इमारती बांधल्या गेलेल्या आहेत.

हा गड राज्य पुरातत्व खात्याच्या ताब्यात असूनही पुरातत्व खात्याचे कुठलेही निकष पाळले जात नाहीत. वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा या बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी पाठिंबा असतानासुद्धा काही लोक या ठिकाणचे बांधकाम पाडू नये, यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोपही समितीकडून करण्यात आला. दरम्यान, विशाळगडावर बहुतांश कर्नाटकातील लोकांची संख्या अधिक असून, कर्नाटकच्या सहा ते सात एसटी गाडय़ा गडाच्या पायथ्याशी मुक्कामी असतात. कर्नाटकमधून अनधिकृत वाहतूक केली जाते. त्यामुळे कर्नाटकच्या गाडय़ांना पायथ्याला थांबण्यासाठी मज्जाव करावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्या बंद करू, असा इशाराही समितीकडून देण्यात आला आहे. यावेळी समितीचे निमंत्रक हर्षल सुर्वे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, मधुकर नाझरे, पंडित पोवार, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, राम यादव, किशोर घाटगे, प्रदीप हांडे, शिवराज घाटगे आदी उपस्थित होते.

शिवछत्रपतींचे स्मारक करा

 विशाळगडाच्या मुंडा दरवाजाशेजारील रणमंडळ टेकडीवर शिवछत्रपतींचे एक भव्य स्मारक उभे करावे, अशी मागणीही समितीकडून यावेळी करण्यात आली.