सरकार टिकण्याची शाश्वती नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला – पृथ्वीराज चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आतापर्यंत ज्या पोटनिवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढली आहे, त्याठिकाणी भाजपचा धुव्वा उडवलेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की आपले सरकार टिकेल का नाही, याची शाश्वती नसल्यामुळे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यामुळे रोज दिल्लीच्या वाऱया सुरू असल्याचा टोला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगणाऱया शंभूराज देसाई यांनी सातारा किंवा वाईत येऊन मुहूर्त काढावा, असेही ते म्हणाले.

आमदार चव्हाण म्हणाले, सध्याच्या सरकारमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे प्रशासनाविषयी न बोललेले बरे. भविष्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो, तर आमचा विजय हा निश्चित आहे. दिल्लीतून मी या ठिकाणी आलो आणि आमदार म्हणून मी काम केले हे मात्र खरे आहे. पण, कोणत्याही विरोधकालाही मदत केली नाही. मला अनुभव नसला तरी राज्याच्या हिताचे चांगले निर्णय त्यावेळी घेतले.

केंद्र सरकारचे बजेट निराशा करणारे असून, यामुळे देशवासीयांचा भ्रमनिरास झाला आहे. अदानीला पोसण्यासाठी हा अर्थ संकल्प असल्याचे दिसत आहे. ‘भारत जोडो अभियान’ यशस्वी झाल्यानंतर त्याचा अनुभव मांडण्यासाठी ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करण्यात आले असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, निखिल कवीश्वर, नरेश देसाई, उदयसिंह उंडाळकर उपस्थित होते.