
उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथील एका वृद्ध शिक्षिकेला तिहेरी तलाक दिल्याची घटना घडली आहे. ही महिला 70 वर्षांची असून तिला तिच्या मुलीने मारहाण केल्याचा आरोपही तिने केला आहे. या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता महिलेने वरिष्ठ पोलिसांकडे दाद मागितली आहे.
या महिलेचं नाव जाहिदा अली असं आहे. 10 जानेवारी रोजी जाहिदा घरी असताना त्यांचा त्यांचे पती मुशीफ अली यांच्याशी वाद झाला. या वादाची परिणती भांडणात झाली आणि मुशीफ यांनी जाहिदा यांना तिहेरी तलाक दिला. या दांपत्याला एक मुलगी आहे. तिने आपल्यासोबत मारहाण केल्याचा आरोप जाहिदा यांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवायला नकार दिल्याचं जाहिदा यांचं म्हणणं आहे. जाहिदा यांची मुलगी रुही खान हिच्या राजकीय दबावामुळे पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला नकार देत असल्याचं जाहिदा यांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जाहिदा यांचा मुशीफ अली यांच्याशी संपत्तीवरून वाद सुरू आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते एकत्र राहत नाहीत, असंही पोलिसांचं म्हणणं आहे.




























































