वेब न्यूज – तुतानखामेनला आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इजिप्त म्हटले की, सर्वात आधी आठवण येते ती भव्य पिरॅमिडस्ची, पिरॅमिड म्हटले की, आठवण येते ती ‘ममी’ची आणि ‘ममी’ म्हटले की, आठवण येते ती तुतानखामेनची आणि त्याच्या प्रचंड श्रीमंतीची. मात्र आता या तुतानखामेनच्या श्रीमंती वर्चस्वाला आव्हान देणारी एक ममी सध्या प्रचंड चर्चेत आलेली आहे. 2300 वर्षांपूर्वी सोन्याचे हृदय व इतरही काही अवयव सोन्याचे बनवून त्यासकट पुरलेल्या एका युवकाच्या ममीने हे आव्हान दिले आहे. संशोधकांनी या ममीला ‘द गोल्डन बॉय’ असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे 1916 साली ही ममी पहिल्यांदा सापडली होती. तिचा जो काही थोडाफार अभ्यास करण्यात आला त्यावरून ही एका 14-15 वर्षे वयाच्या युवकाची ममी असल्याचे समोर आले. त्यानंतर ही ममी कैरोमधील इजिप्शियन संग्रहालयाच्या स्टोअर रूममध्ये इतर डझनभर ममींसह शतकाहून अधिक काळ ठेवण्यात आली होती. आजवर तज्ञांनी त्याचा सखोल अभ्यास केलेला नव्हता. कैरो युनिव्हर्सिटीच्या डॉ. सहार सलीम यांच्या नेतृत्वाखालील टीमने सीटी स्कॅनरद्वारे या ममीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या समोर आश्चर्यांचा खजिनाच उघडला गेला. ममीच्या छायाचित्रांवरून असे दिसून आले आहे की, मृताच्या शरीरात 49 वेगवेगळ्या प्रकारचे 21 ताईत (ताबीज) होते. त्यापैकी बरेच सोन्याचे होते. त्यामुळे या ममीला ‘द गोल्डन बॉय’ असे नाव देण्यात आले आहे. या शोधानंतर आता या ममीला इजिप्तच्या राष्ट्रीय संग्रहालयात स्वतःचे स्थान मिळाले आहे. या युवकाची हाडे व दात अत्यंत निरोगी असून त्याच्यात कुपोषणाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे हा किशोर सधन घरातील असावा असा संशोधकांचा अंदाज आही. त्याचे मृत शरीर संरक्षित करण्यापूर्वी त्याच्या शरीरातील मेंदू व इतर काही अवयव काढून घेण्यात आलेले आहेत. युवकाच्या तोंडातील जीभदेखील सोन्याची आहे. तज्ञांचे असे मत आहे की, मृत व्यक्तीला पुढील जन्मात बोलता यावे या हेतूने सोन्याची जीभ तोंडात ठेवली जात असे.