
लष्करात भरती झालेल्या जवानाने लष्करी प्रशिक्षणासाठी हजर होताना आपल्यावर कुठलेही गुन्हे दाखल नसल्याची खोटी माहिती लेखी पत्राद्वारे देत सैन्य दलाची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच नगरमध्ये उघडकीस आला आहे. या लष्करी जवानावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहितकुमार हरपालसिंह (वय 24, रा. उधमसिंहनगर, उत्तराखंड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. लष्कराच्या नगरमधील कार्यालयातील नायब रिसलदार बाळासाहेब चंद्रकांत मायाण्णा यांनी फिर्याद दिली आहे.
लष्करात भरती झालेला रोहितकुमार हरपालसिंह हा जवान 19 सप्टेंबर 2020 रोजी नगरला लष्करात रिक्रूट ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षणासाठी हजर झाला होता. हजार होताना त्याने ‘आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही,’ असे लेखी प्रतिज्ञापत्र लष्कराच्या कार्यालयाकडे सादर केले होते. मात्र, या जवानाबाबतचा व्हेरिफिकेशन रिपोर्ट नुकताच उत्तराखंडमधील उधमसिंहनगरच्या जिल्हाधिकाऱयांकडून प्राप्त झाला असून, त्याच्यावर उधमसिंहनगर जिह्यात दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. रोहितकुमार याने खोटी माहिती देऊन सैन्य दलाची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध लष्करी अधिकारी बाळासाहेब मायाण्णा यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हेड कॉन्स्टेबल आर. एस. मिसाळ तपास करीत आहेत.




























































