
>> रविप्रकाश कुलकर्णी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही एक अपूर्व गोष्ट आहे. अगदी हिंदुस्थानी पातळीवरदेखील साहित्यप्रेमापोटी एवढय़ा मोठय़ा प्रचंड प्रमाणावर लोक येतात ही गोष्ट आगळीवेगळीच! त्यामुळेच गुलजारसारखा माणूस झटकन आला आणि म्हणाला ‘‘इथला प्रत्येक माणूस म्हणजे मला एक पुस्तक वाटतो.’’ या वाक्यातच संमेलन माहात्म्य आले.
वर्धा येथील साहित्य संमेलन अनुभवून जे काही मनात आले ते आता सांगतो. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे ठरले. आपल्याकडे अनेकदा एकेक व्यक्ती ही त्या संस्थेची ओळख असते. तसे विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर! दुर्दैवाने संमेलनाच्या आधीच म्हैसाळकरांचे निधन झाले आणि ते सावट कार्यकर्त्यांच्या मनावर शेवटपर्यंत राहिल्याचे जाणवत होते. वर्ध्याला संमेलन घेण्यास पुढाकार घेतलेल्या कार्याध्यक्ष अनिश दाते यानी आपल्या प्रास्ताविक भाषणात तसे बोलूनही दाखवले.
आजतगायत कुठल्याही साहित्य संमेलनात वर्ध्याएवढे अवाढव्य मंडप उभारले गेले नव्हते. त्याच्या जोडीलाच स्वतंत्र सहा मोठमोठे मंडप असे हे प्रथमच घडले. ते पाहताच आयोजकांच्या मनात अवाजवी कल्पना आल्या हेच दिसून आले. अलीकडच्या काळात संमेलनाला येऊन येऊन किती माणसे येणार, याची कल्पना करायला नको का? प्रत्यक्ष वर्ध्यातले लोक या संमेलनाकडे फारसे वळलेच नाहीत. याची चाहूल दातेंसारख्या जबाबदार माणसाला कळली नाही का ?
राजकीय माणसे त्या-त्या कार्यक्रमापुरती प्रेक्षक किंवा श्रोते म्हणून त्यांची माणसे आणतात. त्या नेत्यांची भाषणे संपल्यानंतर आपल्या या हक्काच्या माणसांना किमान कार्यक्रम संपेपर्यंत तरी थांबायला हवे हे सांगायला नको काय? मंत्रीमहोदय वगैरे माणसे आली की, बंदोबस्ताला पोलीस अपरिहार्यच. पण त्याची दहशत पसरावी असे अपेक्षित असते का?
उद्घाटनाच्या भाऊगर्दीत संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकरांनी कटाक्षाने आपले अध्यक्षीय भाषण टाळले हे चांगलेच झाले. संध्याकाळी जी काही थोडीशीच माणसे मंडपात होती, ती चपळगावकरांचे विचार ऐकायला आली होती. भले तेव्हा भल्यामोठय़ा मंडपात थोडीच माणसे असली तरी मात्र अध्यक्षीय भाषणावर चर्चा करण्याचे कोणाच्या डोक्यात आले? एवढय़ा तडकाफडकी आणि गांभीर्याने भाषणावर चर्चा होऊ शकते का ? संमेलनस्थळी असलेल्या सभा मंडपाला महनीय व्यक्तींची नावे देण्याचा प्रघात जुनाच आहे, पण त्या व्यक्तींची ओळख संमेलनाला आलेल्या बऱयाच जणांना नसते. त्यासाठी त्या महनीय व्यक्तीची माहिती देणारा फलक असायला हवा, जेणेकरून त्या व्यक्तीची ओळख होऊ शकते.
आता ग्रंथदालनासंदर्भात थोडेसे. ही गोष्ट अपरिहार्य असली तरी त्याबाबत ना संमेलनकर्ते गंभीर असतात ना पुस्तक विक्रेते! ग्रंथदालनाची मांडणी करताना किमान उन्हाची झळ लागणार नाही हे भान त्या वर्ध्याच्या मांडणीकाराला नसावे? त्या उन्हाचा त्रास ग्रंथदालनवाल्यांना झालाच, पण ते प्रदर्शन पाहायला येणाऱया वाचकांनाही झाला. त्यांनी पाठ फिरवली याची जाणीव कुणालाच झाली नाही?
आणखी एक गोष्ट, या ग्रंथदालनात 300 तरी स्टॉल्स होते, परंतु कुठल्या प्रकाशकाचा स्टॉल कुठे आहे हे कळण्याची सोयच नव्हती. वर्षानुवर्षे हे असेच का चालते ते कळत नाही. सरतेशेवटी आणखी एक उल्लेख करायला हवा. संमेलनाच्या समारोप सत्रात संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकरांनी म्हटले, संमेलनाच्या आयोजनासाठी आपण सरकारचा पैसा घेऊ नये, आपल्या जोरावर अशी संमेलने घेतली पाहिजेत. चपळगावकरांच्या आशावादाला आपण पाठिंबा देऊ शकतो, पण ते शक्य नाही.
आता संमेलनाला सरकार दोन कोटी रुपये अनुदान देणार आहे. एरवी संमेलन संपता संपता पुढचे संमेलन आम्ही घेतो असे सांगणारे पुढे येतात. यंदा मात्र असे एकही आमंत्रण आलेले नाही हे आश्चर्यच! मात्र 15 एप्रिलपर्यंत महामंडळाकडे इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केले आहे. म्हणजे ‘नवी विटी नवे राज्य’ या चालीवर. तरीसुद्धा रसिक वाचक सर्व गैरसोयी गृहीत धरून संमेलनाला जाणार.






























































