कविता मनामनातली – माणूसपणाचा शिलालेख कोरणाऱ्या कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गीतेश शिंदे

कमर दुखता कमर वळ्टा
खूप दीस जालें कमर फोट्टा
सामखीच घट जाल्या कमर
कायच करूंक मेळाना धांदल जाल्या घरान्
जरी या कवितेच्या ओळी कोंकणीत असल्या, तरी ही व्यथा सर्वच प्रदेशातील स्त्र्ायांची म्हणावी लागेल. जी मांडली आहे गोव्यातील कवयित्री अनुजा जोशी यांनी त्यांच्या ‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ या कवितासंग्रहातून. 2017 मध्ये लोकवाङ्मय गृहाकडून प्रसिद्ध झालेला अनुजा जोशींचा हा दुसरा कवितासंग्रह. या कवितासंग्रहाद्वारे समकालातील चिंतनशील कवयित्री म्हणून त्यांनी आपली नाममुद्रा ठळकपणे उमटवली आहे. सुरुवातीला दिलेल्या कवितेच्या ओळींतून त्याची प्रचीती जरूर येते. सत्तरीसारख्या गोव्यातील ग्रामीण भागात डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करणाऱया अनुजा जोशींचा कवितागत ’मी’ जागृत असल्याचं जाणवतं. उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे येणाऱया स्त्र्ायांचं दुखणं, वेदना, अडचणी या कमीअधिक प्रमाणात कवयित्रीला सारख्याच जाणवतात. सृजनाचं, नवं-निर्मितीचं निसर्गतःच वरदान लाभणं या गोष्टीकडे वेगळय़ा कंगोऱयातून पाहायला ही कविता भाग पाडते.
झाडांनी बुडाशी लिंपलेल्या
सावलीला हसण्याइतकं
बळ संचारतं कुठूनसं अंगात
सैराटतात पाय फुफाटय़ातून
उन्हाच्या व्हाणा करून

‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ (पृ. क्र. 13) या शीर्षक कवितेतील वरील ओळींतून उन्हाच्या प्रतीकांमधून कवयित्री व्यक्त होऊ पाहते. उन्हाची तीव्रता, दाहकता ठाऊक असूनही त्याची विलक्षण ओढ तिला लागलीय. किंबहुना हे उन तिला इतकं चढलंय की तिच्यात सावली झुगारण्याचं बळ संचारलंय. तिनं पाण्याच्या घागरी डोईवर घेण्याचं नाकारून उन्हाचे घुमटच आपल्या खांद्यावर मिरवायचं ठरवलंय. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्याची तिची तयारी दिसून येते.

विद्यार्थीदशेत बालमन सर्व काही टिपत जातं. भलंबुरं त्यांच्या मनावर आदळत राहतं. चित्रातून हे बालमन आपसूकपणे व्यक्त होतं. याच अनुषंगानं ’माझा मुलगा चित्र काढतोय’ या कवितेकडे पाहायला हवं.

मुलगा किंवा विद्यार्थी चित्रं काढताहेत आणि ते पाहिल्यानंतर कवितागत ‘मी’ला- मग ती आईच्या भूमिकेतील, वडिलांच्या किंवा चित्रकला शिक्षकाच्या भूमिकेत असो; त्यांना निरुत्तर करणारे प्रश्न पडतात. त्या चित्राच्या निष्कर्षातून समाजातील प्रश्न मांडू पाहतो. हाच आशय व्यक्त करताना कवयित्री लिहिते,

हाक मारतो, आई हे बघ म्हणतो
हा मॅथ्सचा खांब, हा जॉमेट्रीचा हा फिजिक्सचा
हा टय़ुशन्सचा, हा ऍडमिशनचा खांब…

मुलगा चित्रामध्ये खांबासारखं काहीतरी काढतोय, त्यावर त्यानं काटेरी कुंपणही दाखवलंय. तो स्वतःच आईला ते खांब कसले आहेत याचं स्पष्टीकरण देताना आजच्या शिक्षणव्यवस्थेनं लादलेल्या ओझ्याबद्दल त्याच्या मनात काय सुरू आहे ते व्यक्त करू पाहतोय.
आता मला

जोडून रहायचं नाही कुठेच
मूळ पेपरच्या एखाद्या सप्लिमेंटसारखं
मला द्यायचं आहे
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
माझ्या भाषेत विचारपूर्वक

’माणूस’ नावाचा शिलालेख लिहून’ (पृ. क्र. 64) या कवितेतील वरील ओळींतून कवयित्री बाईपणातून बाहेर पडू इच्छित असल्याचं सुतोवाच करते. तिला बाई म्हणून कोणतंही झुकतं माप नकोय. इथं ती स्वतःसोबतच पुरुषालाही पुरुषपणाच्या जोखडातून मुक्त करू पाहतेय. अनुजा जोशींच्या कवितांमधून फक्त स्त्र्ााr-जाणिवाच व्यक्त होत नाहीत, तर त्यातून माणूसपणाची नवी लिपी त्या तयार करू पाहतात. ज्यातून नव्या शतकाचा ‘माणूस’केंद्री शिलालेख कोरला जाईल असा आशावाद दिसून येतो.

‘मागून येणाऱ्या मुलींचा कानोसा घेत’, ‘आई हरवली’, ‘पीक’, ‘अर्पणपत्रिका’ या कविता देखील उल्लेखनीय असून वेगळा आशय पकडू पाहतात. संग्रहातील बहुतांश कविता मुक्तछंदातील असल्या तरी ‘स्मरते मी’, ‘अर्धी उघडी खिडकी’, ‘रात्र लवंडली’ अशा काही लयबद्ध कविताही आहेत ज्यामुळे कवयित्रीच्या अंगीभूत लयीशी ओळख होते. धुकाळ उजेड, उन्हाच्या वहाणा, नदीच्या ओठांवर, शब्दांचे दिवे अशा प्रतिमांमधून या कवितांचा आशय अधिक गहिरा झाला आहे.

उन्हाचे घुमट खांद्यावर
कवयित्री : अनुजा जोशी
प्रकाशक: लोकवाङ्मय गृह
पृष्ठे : 104, मूल्य : रुपये 160/-