
मोलकरणीचे काम मिळाल्यावर, मग संधी मिळेल तसे घर साफ करून पसार होणारी एक सराईत चोरटी मोलकरीण गजाआड झाली. मालकिणीचे 303 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 15 हजार रुपयांची रोकड चोरून पळालेल्या वेदा शेरे (39) या मोलकरणीला एमआयडीसी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
अंधेरी पूर्वेकडील पूनमनगरातल्या धीरजवैभव इमारतीत फ्लॅट नंबर 501मध्ये वेदा मोलकरणीचे काम करीत होती. गुरुवारी तिने घरात कोणी नसल्याची संधी साधून 16 लाख 52 हजार किमतीचे 303 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 15 हजारांची रोकड असा 16 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी घरमालकांनी तक्रार दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्नशनाखाली उपनिरीक्षक यशवंत पालवे व पथकाने गुह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एका रिक्षातून ती जाताना दिसली. त्या रिक्षाचालकाची चौकशी करून अधिक तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यावर मोलकरीण शिवडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवडी गाठून वेदा शेरे (39) या मोलकरणीला पकडले. तिच्याकडून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला. तिच्या विरोधात माटुंगा, माहीम, शीव पोलीस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
























































