पुलाची शिरोलीत दोन सिरॅमिक दुकानांना भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील पुलाची शिरोली येथील सांगली फाटय़ावरील सिरॅमिकच्या दोन दुकानांना भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. यात सिरॅमिक साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुलाची शिरोली येथील कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गालगत मार्बल लाईन आहे. येथील टोल शेडलगतच्या इंगळे सिरॅमिकला पहाटे पाचच्या दरम्यान अचानक आग लागली. दुकानांमध्ये प्लायवूड, रबरी मॅट असल्याने आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. कोल्हापूर मनपाच्या अग्निशमन विभागाला याची माहिती कळविण्यात आली. मात्र, अग्निशमन बंब येईपर्यंत इंगळे सिरॅमिक सेंटर जळून खाक झाले होते.

या दुकानालगतच चंदवानी सिरॅमिक दुकान आहे. इंगळे सिरॅमिक सेंटरला लागलेल्या आगीने चंदवानी सिरॅमिक सेंटरच्या बाजूला लावलेल्या वातानुकूलित मशीनला आग लागून त्याची वायर जळत आग चंदवानी सिरॅमिकमध्ये घुसली. अग्निशमन दलाचा बंब एकच असल्याने सुरुवातीला आग आटोक्यात आणणे कठीण होते. त्यानंतर अन्य अग्निशमन दलाच्या बंबानाही पाचारण करण्यात आले. तोपर्यंत चंदवानी सिरॅमिकच्या दुसऱया मजल्यावर असलेले परदेशी बनावटीचे साहित्य जळून खाक झाले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तिन्ही बाजूंनी बंब उभे करून पाण्याचा मारा केला. तर, काही जवानांनी दुसऱया मजल्यावर चढून काचा खिडक्या तोडून आत प्रवेश करून पाण्याचा मारा करून तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिरोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.