आम्ही कधीच भाजपशी तडजोड केली नाही! नितीश यांच्या वक्तव्यावर जयराम रमेश यांचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल देशातील आगामी निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले होते. पंतप्रधान पदासाठी माझी वैयक्तिक इच्छा नसल्याचे सांगत भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढे यावे व त्यांनी विरोधकांच्या एकजुटीला उशीर करू नये, असे ते म्हणाले होते. तसेच सर्व विरोधक एकत्र आल्यास भाजपला 100 चा आकडा गाठणेही कठीण होईल. असेही ते म्हणाले होते.

नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पलटवार केला आहे. जयराम रमेश यांनी म्हटले की, भारत जोडो यात्रेबाबत विरोधकांची एकजूट आवश्यक आहे. या एकजुटीसाठीच काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली होती. आम्हाला आमची भूमिका चांगलीच ठाऊक आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याने भाजपशी कधीही तडजोड केली नाही. आमचा एकच चेहरा आहे.

विरोधी एकजुटीच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेत सर्व पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. भेटीनंतर बदल दिसून आले. आता केवळ या भेटीसंदर्भात अधिवेशन होत आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसला मजबूत केल्याशिवाय विरोधी एकजूट शक्य नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची आघाडी आहे.

या मुद्द्यावर केसी वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेसने भारत जोडो यात्रेदरम्यान विरोधकांना एकत्र आणून भाजपविरोधात लढा देण्यासाठी आधीच पुढाकार घेतला आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्याचे काँग्रेसने स्वागत केले आहे. भाजपच्या जागा कमी करणे हे आमचे काम आहे.