सौराष्ट्रने दुसऱयांदा रणजी करंडक जिंकला,बंगालचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौराष्ट्रने 2019-20 मध्ये बंगालचाच पराभव करून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा उभय संघ या स्पर्धेच्या किताबी लढतीत भिडले, मात्र सौराष्ट्रने पुन्हा एकदा बंगालचे रणजी करंडक जिंकण्याचे स्वप्न भंगवले. जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघाने अंतिम फेरीत बंगालचा चौथ्याच दिवशी 9 विकेट राखून पराभव करत दुसऱयांदा रणजीच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट या सामन्याचा मानकरी ठरला, तर ‘मालिकावीरा’चा बहुमान याच संघातील अर्पित वसावडा याला मिळाला. बंगालने याआधी 1989-90 मध्ये रणजी करंडक जिंकला होता. तब्बल 33 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या संघाने रणजी स्पर्धा जिंकण्याची संधी दवडली.

कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत सौराष्ट्रने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडय़ांवर सरस खेळ केला. सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी बंगालचा पहिला डाव 174 धावांत गुंडाळून येथेच अर्धी लढाई जिंकली होती. जयदेव उनाडकट आणि चेतन साकारिया यांनी 3-3 विकेट घेतल्या होत्या, तर चिराग जानीने 2 विकेट घेतल्या होत्या. मग सौराष्ट्राने हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन, अर्पित आणि चिराग जानी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 404 धावसंख्या उभारून पहिल्या डावात 230 धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे मनोज तिवारीच्या नेतृत्वाखालील यजमान बंगालचा संघ दबावात आला. दुसऱया डावात त्यांना केवळ 241 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे सौराष्ट्रने मिळालेले 12 धावांचे लक्ष्य 2.4 षटकांत 1 बाद 14 धावा करीत पूर्ण केले अन् जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

बंगाल पाचव्यांदा अपयशी
1989-90 साली बंगालने तब्बल 50 वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर रणजी करंडकाचे जेतेपद पटकावले होते. त्याआधी त्यांच्या संघाने 1938-39 साली दक्षिण पंजाबला हरवून आपले पहिले जेतेपद संपादले होते, मात्र तिसऱया करंडकासाठी गेले 33 वर्षे बंगालचा संघ झगडतोय. 1989-90 नंतर त्यांनी चक्क पाच वेळा अंतिम फेरीत धडक दिली, मात्र प्रत्येक वेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याआधीच्या चारही वेळेला अंतिम सामना कोलकात्यात नव्हता. मात्र यावेळचा अंतिम सामना कोलकात्यात असल्याने बंगालला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र सौराष्ट्रने पहिल्या दिवसापासून सरस खेळ करीत बंगालचे जेतेपदाचे स्वप्न भंगवले.