माझा ‘मेटे’ करण्याचा डाव! अशोक चव्हाण यांचे धक्कादायक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असून आपला विनायक मेटे करण्याचा कट रचण्यात आला आहे. मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून बदनामीकारक बनावट पत्रेही तयार करण्यात आली असून त्याचा वापर होण्याची शक्यता असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नांदेड पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

अशोक चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील आपली सही कायम ठेवली आणि मुळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले. यासंदर्भात आपण अगोदरच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला होता. या प्रकरणात 31 जानेवारीपासून चौकशीही सुरू झाली आहे.

आज अशाच बनावट लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहिलेले एक खोटे पत्र अशोक चव्हाण यांना मिळाले. हे पत्र पाहून अशोक चव्हाण यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांची भेट घेऊन तात्काळ लेखी तक्रार दाखल केली. या बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भाडोत्री गुंडांकडून आपल्यावर पाळत

मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर भाडोत्री गुंडांकडून पाळत ठेवण्यात येत आहे. या व्यक्ती पाठलाग करून आपल्या भेटीगाठीची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून आले आहे. आपला विनायक मेटे करण्याचा कट असल्याचा संशयही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.