
>> प्रज्ञा सदावर्ते
भावनाशून्य होत चाललेल्या आजच्या जगात इतरांच्या वेदनेने व्याकूळ होणारी माणसं सापडेनाशी झाली आहेत. अशी माणसं भेटली की, मानवतेचा दूत भेटल्याचा आनंद होतो, याचीच प्रचीती देणारा नाशिक येथील कवी जगदीश देवरे यांचा ‘चुलीतले निखारे’ हा कवितासंग्रह आहे. घाव सोसलेले काळीज जणू बोलू लागलेय इतकी मनाला भिडणारी आणि तितकीच साधीसोपी भाषा लक्षवेधक आहे. निखारे दाखवता दाखवता समाजातील चेतना धगधगती ठेवण्याचे काम करणारा, समाजमन घडवणारा हा काव्यसंग्रह आहे.
सामान्य माणसाचं जगणं, त्याची जगण्याची लढाई यांचं प्रतिबिंब इथे पानापानावर वाचायला मिळतं. या संग्रहात एकूण 57 कविता आहेत. त्याला प्रस्तावना साहित्यिक प्रा. डॉ. दिलीप धोंडगे यांची आहे. देवरे यांच्या कवितेवर संपूर्ण कवी परंपरेचा प्रभाव आहे. साधीसोपी भाषा हेच तिचे बलस्थान आहे.
दुष्काळानं नुसतंच शेत होरपळून निघत नाही, तर ती झळ जीवाला जाळणारी असते, हे सांगणारी ‘दुष्काळ’ कविता वाचणाऱया प्रत्येकाला अस्वस्थ करून जाते.
कोरडाच सातबारा अंगठाच लावला मी
जाहीर कागदावरचा दुष्काळ झेलला मी
अनुभवलेलं खरंखुरं जगणं या संग्रहातून आपल्या भेटीला आलं आहे. ते केवळ मांडून कवी थांबत नाही, तर बदल घडविण्याचे भान जागविताना दिसतो. सभोवतालचं दुःखं, त्यावर फुंकर घालण्याची तळमळ, तरल भावना आणि छोटय़ा गोष्टींमधला आशय अगदी ठळकपणे मांडण्याची प्रभावी शैली ही या संग्रहाची वैशिष्टय़े असून खऱया अर्थाने समाजमनाला दिशा देण्याचे काम यातून घडणार आहे.





























































