
>> नवनाथ शिंदे
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 29 हजारांवर आरोपींचा डेटा लाईनअप केला आहे. त्याद्वारे संबंधितांची कुंडली अपडेट करून हजेरी घेतली जात आहे. मागील महिन्याभरात एमओबी विभागाकडून डेटा संकलित करण्याची मोहिम फत्ते करण्यात आली आहे. विशेषतः शरीराविरुद्धचे गुन्हे आणि मालमत्ता चोरी करणार्यांची इत्भूंत माहिती एकत्रित करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याशिवाय हद्दीतील आरोपींची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांची हजेरी घेत झाडाझडती करण्यावर भर देण्यात आला आहे.
पादचारी, चाकरमान्यासह नागरिकांची लुटमार करीत हैदोस घालणार्या गुंडांचा बिमोड करण्यासाठी गुन्हे शाखेने मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार 18 जानेवारी ते 18 फेब्रुवारी कालावधीत एमओबी विभागाकडून आरोपींचा डेटा एकत्रित करण्यात आला. त्यानुसार शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे तब्बल 22 हजार आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यापैकी 16 हजारांवर गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच गुन्हे शाखेच्या विविध 11 पथकांकडून होणार्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळेही गुन्हेगारांनी धसका घेतला आहे. त्यामुळे महिन्याभरात गंभीर गुन्ह्यांचा आलेख कमी झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः रात्री-अपरात्री घडणार्या गुन्ह्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. त्याशिवाय कोम्बिंग ऑपरेशन आणि ऑल आउट ऑपरेशनद्वारेही गुडांची धरपकड करण्यात येत आहे. परिणामी कारवाईच्या भीतीने नामचिन गुडांसह सराईतांनी पलायन केले आहे.
गुन्हे शाखेकडून मालमत्ता चोरणार्यांविरुद्धही ठोस मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार 2015 पासुन मागील 7 वर्षांतील गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात आली आहे. घरफोडी, चैनस्नॅचिंग, मोबाइल हिसकाविणारा, वाहने चोरणार्यांची स्वतंत्र डेटा अपडेट करण्यात आला आहे. मालमत्ताविषय गुन्हे करणार्यांची माहिती घेउन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. प्रॉपर्टीसंदर्भात आतापर्यंत 6 हजार 500 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी साडेतीन हजारांवर गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. संंबंधित गुन्हे करणारे सर्वाधिक आरोपी हडपसर, कोंढवा, येरवडा, भारती विद्यापीठ, चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहेत. त्यामुळे त्यांची अपडेट माहिती, लोकेशन, कौटुंबिक माहिती संंबंधित ठाण्यांना पाठविण्यात आला आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून वेळोवेळी होणारी तपासणी, हजेरी, झाडाझडतीमुळे गुन्हेगारांमध्ये कारवाईची भीती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांची होणारी लुटमार, शरीराविरुद्धचे गुन्हे घटण्यास मदत झाली असून हद्दीत शांतता प्रस्थापित झाली आहे.
महिन्याभरातील कारवाई
शरीराविरुद्धचे गुन्हेगार – 22 हजार
गुन्हे शाखेने तपासलेले आरोपी-16 हजार
प्रतिबंधात्मक केलेली कारवाई- 15 हजार 900
पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे गुन्हेगार
हडपसर 2 हजार 300, येरवडा-1 हजार 50, कोंढवा- 1 हजार 200, चतुःशृंगी- 1 हजार 200
मालमत्तेचे गुन्हे करणार्यांची माहिती
मागील सात वर्षांतील मालमत्तेचे गुन्हे करणार्या 29 हजारांवर गुन्हेगारांची यादी एमओबी विभागाने तयार केली आहे. त्यापैकी 6 हजार 500 जणांविरुद्ध प्रबिंधात्मक कारवाई केली असून साडेतीन हजारांवर आरोपींविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामध्ये घरफोडी, वाहनचोर, मोबाइल चोर, चैनस्नॅचिंग करणार्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनील पवार, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमओबी पथकाने माहिती संकलित केली आहे.
शरीराविरुद्धचे गुन्हे आणि मालमत्ताविषयक गुन्ह्याच्या बाबतीत गुन्हे शाखेकडून तातडीने लक्ष देउन कारवाई केली जाते. विशेषतः संबंधित आरोपींच्या इत्भूंत माहितीचा डेटा एमओबीकडून संकलित करण्यात आला आहे. त्याद्वारे आरोपी सद्यस्थितीत काय करतो, त्याचे नाव-उपनाव, राहण्याचे ठिकाण, कौटुंबिक माहितीतून माहिती अपडेट केली आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणे, झाडाझडती घेतली जात आहे. कोंम्बिंग, ऑपरेशन ऑलआउटमुळे गंभीर गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे


























































