उन्हाच्या झळांमुळे लिंबांच्या मागणीत वाढ; लिंबू महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाल्याने लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. सरबत विक्रेते, तसेच रसवंतीगृह चालकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एका लिंबाची विक्री तीन ते पाच रुपयांना केली जात आहे.

बाजारात लिंबांची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत लिंबांचा तुटवडा जाणवत असून रसवंतीगृहचालक आणि सरबत विक्रेत्यांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या लिंबांची आवक कमी प्रमाणावर होत असून गेल्या दहा दिवसांत घाऊक बाजारात लिंबाच्या दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती लिंबू व्यापाऱ्यांनी दिली.

किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री प्रतवारीनुसार तीन ते पाच रुपयांना केली जात आहे. सध्या दररोज दीड हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. दहा दिवसांपूर्वी लिंबांच्या दोन ते तीन हजार गोणींची आवक होत होती. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातून लिंबांची बाजारात आवक होत आहे. प्रतवारीनुसार लिंबांच्या गोणीला 400 ते 1400 रुपये असा दर मिळाला आहे, असे जाधव यांनी सांगितले.

दहा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात दहा रुपयांना पाच लिंबे मिळायची. उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत वाढ झाली असून सध्या किरकोळ बाजारात एका लिंबाला प्रतवारीनुसार तीन ते पाच रुपये असा दर मिळत आहे. येत्या काही दिवसांत लिंबांच्या मागणी आणि दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.