
झारखंडच्या रांचीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हत्येचा आरोप करत साठ ते सत्तर लोकांच्या जमावाने एका महिलेला जोड्याने बेदम मारले, त्यानंतर तिला विवस्त्र करुन संपूर्ण गावात तिची धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. महिलेने रांची जिल्ह्यातील अंगदा पोलीस स्टेशनमध्ये 7 नावांसह 60 हून अधिक अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपींची धरपकड सुरु केली आहे.
झारखंडची राजधानी रांचीमधील घोडतलवा गावातील ही लाजिरवाणी घटना आहे. जिथे 60 ते 70 लोकांच्या जमावाने महावीर महतो यांच्या कुटुंबीयांवर खुनाचा आरोप करत अचानक हल्ला केला. त्यांची पत्नी, सासरा धनेश्वर महतो व इतर कुटुंबीयांना जोडे व चप्पलने मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच ते न थांबता त्यांनी महावीर महतोच्या वहिनीची गावात विवस्त्र करुन धिंड काढली आणि तिच्यावर खुनाचा आरोप केला. यावेळी गावातील लोक तिला वाचवण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत होते. सुमारे 1 तास महिलेला आरोपींनी गर्दीच्या मध्यभागी विवस्त्र अवस्थेत उभे केले. घटनेची माहिती मिळताच अंगदा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडित महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पीडितेने तिची मृत जाऊ शिलावंती देवीचा भाऊ, तिची बहीण, मामा, भावजय आणि इतरांविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.
बुधवारी पीडिते महिलेची जाऊ शीलावंती देवी हिचा मृतदेह रांची जिल्ह्यातील तातीसिल्वे पोलीस स्टेशन परिसरात आढळून आला. खटंगा लालगंजरांची येथील रहिवासी असलेल्या शीलावंतीच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप शिलावंतीचा पती महावीर महतो वर लावला. नातेवाइकांचा आरोप आहे की, महावीर महतोचे इतर अनेक महिलांशी अवैध संबंध होते, ज्याला त्यांची पत्नी शिलावंतीने विरोध केला होता, त्यामुळे त्याने काटा काढण्यासाठी तिची हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेले शिलावंतीचे कुटुंब 60 ते 70 जणांच्या जमावाने तिच्या सासरी पोहोचले. त्यांनी महोतच्या संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला. संतप्त लोकांचा जमाव पीडित महिलेला तिचा पती आणि इतर लोकांसह ठार मारण्याच्या इराद्याने होता, सर्वांना बेदम मारहाण केल्यानंतर जमावाने पीडित महिलेची जाऊ हिला विवस्त्र करत तिची गावात धिंड काढली. यावेळी गावातीलशेकडो लोक उपस्थित होते, मात्र कोणीही महिलेला वाचवण्याचे धाडस दाखवले नाही.

























































