कोल्हारच्या बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास; व्यापारी, ग्रामस्थांनी स्वतःहून काढले अतिक्रमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिक्रमण हटाव मोहीम म्हटले की, व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांचे वाद-विवाद आणि विरोध ठरलेलाच. याला मात्र कोल्हार, भगवतीपूरमधील ग्रामस्थ व व्यावसायिक अपवाद ठरले आहेत.  कोल्हार आणि भगवतीपूर येथील श्री भगवती देवीच्या मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावरील सर्व अतिक्रमित दुकाने व्यावसायिक स्वतः काढून घेत आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून गुदमरलेला बाजारपेठेचा श्वास मोकळा झाला आहे. राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून, व्यापारी, ग्रामस्थ स्वतः दुकाने काढून घेत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हार, भगवतीपूरमधील या रस्त्यालगत दुकाने थाटलेली होती. शंभरपेक्षा जास्त दुकाने या रस्त्यालगत असावीत. यामध्ये बरीचशी दुकाने पत्र्याच्या शेडमध्ये होती, तर काहीजणांनी पक्के बांधकाम केलेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय अनेक वर्षांपासूनचा आहे; परंतु तो पुढे-पुढे टळत गेला. चार ते पाच महिन्यांपासून अतिक्रमण काढण्याच्या या प्रक्रियेने वेग घेतला होता. या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित दुकानदारांना तीन नोटिसा बजावल्या. गावात ध्वनिक्षेपकाद्वारे सूचनाही दिल्या. तसेच समक्ष भेटूनही सांगण्यात आले. दुकाने काढल्यानंतर आता रस्ता रुंदीकरण होणार आहे.

रस्त्याच्या दुतर्फा असणाऱया पत्र्याच्या शेडमधील सर्व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने काढून घेतली असून, ही प्रक्रिया कालही सुरू होती. विस्थापित झालेल्या दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी कोल्हार बुद्रूक ग्रामपंचायतने पर्यायी ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजित केले आहे. त्याला लवकरच सुरुवात होईल. स्वतःहून अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारची (दि. 2) अंतिम मुदत दिलेली होती. गुरुवारी सकाळीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, त्यांच्यासोबत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस बंदोबस्तासह याठिकाणी हजर होते. मात्र, बुधवारी सकाळपासूनच दुकानदारांनी आपापली दुकाने स्वतः काढून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत परस्पर सामंजस्याने पार पडली. स्वयंस्फूर्तीने दुकाने काढली जात असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील कडक धोरण घेतले नाही.

पुनर्वसनासाठी कोल्हार बुद्रूक ग्रामपंचायतचा पुढाकार

रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिकांची पर्यायी जागेत व्यवस्था करण्यासाठी कोल्हार बुद्रूक ग्रामपंचायतने पुढाकार घेतला. येत्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये येथील मटण मार्केटमध्ये किमान 60 नवीन गाळ्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. शक्य होईल तेवढय़ा दुकानदारांचे पुनर्वसन केले जाणार आहे. याबद्दल संबंधित दुकानदारांसोबत अनेकदा ग्रामपंचायत स्तर व अधिकारी यांच्यात बैठकी झालेल्या आहेत.

दुभाजकासह रस्ता होणार आकर्षक

राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के. बी. गुंजाळ आणि शाखा अभियंता एन. बी. जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी 650 मीटर लांबीचा रस्ता चौपदरी होणार असल्याचे सांगितले आहे. रस्त्याची रुंदी 15 मीटर राहणार असून, दोन्ही बाजूने साईड गटार करण्यात येणार आहेत. रस्त्याच्या मधोमध दुभाजक असेल. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. यासोबत गावाचा चेहरामोहराही बदलेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या हद्दीतील अतिक्रमण काढले जात आहे. भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशे घेऊन सर्व दस्तावेज तपासून मोजणी करून ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.