
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कधी नेपोटिझममुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. गेल्या काही वर्षांपासून करणने दिग्दर्शनातून काही काळ विश्रांती घेतली. पण, हा अनुभव कसा होता, याबाबत त्यानेच एका माहितीपटात खुलासा केला आहे.
यशराज फिल्म्स या प्रसिद्ध निर्मितीसंस्थेचे प्रमुख दिवंगत यश चोप्रा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या माहितीपटात करणने आपला अनुभव सांगितला आहे. यश यांचा मुलगा आदित्य चोप्रा याच्याशी झालेल्या एका भांडणाच्या किश्श्याला त्याने यावेळी उजाळा दिला. 2006 साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटाच्या दरम्यान करण आणि आदित्य चोप्रामध्ये वाद झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं होतं. या चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्यात एक प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आला होता.
त्याच प्रसंगावरून करण आणि आदित्य यांच्यात मतभेद झाले होते. आदित्यला तो प्रसंग चित्रपटात नको होता आणि त्यासाठी त्याने नाराजीही व्यक्त केली होती. त्याविषयी बोलताना करण म्हणाला की, आम्ही तो प्रसंग चित्रीत करत होतो. तेव्हा मला आदित्यचा फोन आला आणि त्याने सांगितलं की, या दोन पात्रांनी आत्ता अशी जवळीक साधणं योग्य नाही. हिंदुस्थानी प्रेक्षक ही गोष्ट स्वीकारणार नाहीत. त्यांनी तिथून मागे वळणंच योग्य ठरेल. मी मात्र माझ्या मतावर ठाम होतो. एखादं जोडपं प्रेमाच्या नात्यात आहे आणि त्यांच्यात शारीरिक संबंध नाहीत ही गोष्ट मला न पटणारी होती. त्यामुळे तेव्हा आमचा फोनवर प्रचंड वाद झाला. नंतर जेव्हा मी तो चित्रपट शांतपणे बसून पाहिला तेव्हा मला आदित्यचं म्हणणं पटलं, अशी कबुली देखील करणने यावेळी दिली.

























































