लालूंची सीबीआय चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lalu prasad yadav

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने आज लालूप्रसाद यादव यांची चौकशी केली. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. लालू यांची तब्बल तीन तास चौकशी सुरू होती.

सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लान्ट झाल्यानंतर लालूप्रसाद यांचा मुक्काम मुलगी मिसा भारती हिच्या घरी आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात सीबीआयच्या चार्जशीटनुसार कोर्टाने लालू, राबडीदेवी आणि मिसा यांना समन्स पाठवले होते.

दिल्लीचे तख्त उखडून टाकू

चौकशीदरम्यान वा नंतर लालू यांची प्रकृती बिघडली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, दिल्लीचे तख्त उखडून टाकू, असा इशारा लालू यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी दिला आहे.

सिसोदियांवर प्रश्नांची सरबत्ती

‘ईडी’ने तिहार जेलमध्ये जाऊन मनीष सिसोदिया यांची चौकशी केली. मद्य घोटाळय़ात मनी लॉण्ड्रिंग केल्याच्या आरोपाखाली सिसोदिया यांना अटक झाली आहे. राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने सिसोदियांची तीन दिवस चौकशी करण्याची परवानगी ईडीला दिली आहे. दरम्यान, सिसोदिया यांचे निकटवर्ती देवेंद्र शर्मा ऊर्फ रिंकू यांचीही ईडीने मंगळवारी चौकशी केली. दरम्यान, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्यापेक्षा मला देशाची चिंता अधिक वाटते अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. हे दोघेही बहादूर असून देशासाठी ते आपले प्राणही देतील. तुरुंगाच्या भिंतीत त्यांचा निर्धार तुम्ही तोडू शकणार नाही असे केजरीवाल म्हणाले.